पनवेल : दिव्यांग व्यक्तींना आठवड्यातील एक दिवस आणि एक ठिकाण ठरवून ऑफलाईन नोंदणी करून लसीकरण करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी निवेदनादवारे आयुक्तांकड़े केली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत सद्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात केलेली असून cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून शेडूल बुक केल्यावरच नोंदणी होत आहे. तसेच लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने त्याचा त्रास दिव्यांग व्यक्तिना होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य होत नसल्याने त्यांच्यासाठी आठवड्यातील एक दिवस आणि एका ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून लसीकरण करावे. अशी महत्वाची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केली आहे. दिव्यांग व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असल्याने कोरोना विषाणूचा अधिक धोका असतो, ही बाब लक्षात घेत दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसंच आवश्यक उपचारासाठी रांगेत उभं रहावं लागू नये; तसंच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना प्राधान्य दिलं जावे अशी मागणी प्रितम म्हात्रे यानी केली आहे.