बनावट आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट देणार्‍यास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले जेरबंद


पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः कुठल्याही प्रकारचे स्वॅब न घेता दोन हजार रुपयांमध्ये ‘कोव्हीड-19’ आरटीपीसीआर टेस्टचे निगेटीव्ह रिपोर्ट तयार करुन देणार्‍या दुक्कली पैकी एकाला गुन्हे शाखा कक्ष- 2 पनवेलच्या पथकाने कळंबोलीतून सापळा लाऊन अटक केली आहे.
गुन्हे शाखेने आता आरटीपीसीआरचे रिपोर्ट तयार करुन देणार्‍या लॅब टॅक्नीशीयनचा शोध सुरु केला आहे. नोकरदार वर्गाला तसेच प्रवासासाठी आणि इन्शुरन्स क्लेमसाठी लागणारे ‘कोव्हीड-19’चे आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट स्वॅब न घेता, कळंबोलीत राहणारा संजय ईश्‍वर भंडारी (35) दोन हजार रुपयांमध्ये तयार करुन ते व्हॉटस्अ‍ॅप द्वारे देत असल्याची माहिती उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेने दोन बोगस नावाने आधारकार्ड तयार करुन ते बोगस ग्राहकाच्या माध्यमातून संजय भंडारी याच्या मोबाईलवर पाठवून दिले. तसेच त्या नावाने आरटीपीसीआरचे निगेटीव्ह रिपोर्ट तयार करुन देण्यास सांगितले. यावेळी भंडारी याने दुसर्‍या दिवशी दुपारी दोन्ही व्यक्तींचे रिपोर्ट मिळतील, असे बोगस ग्राहकाला कळविले होते. त्यानुसार भंडारी याने दोन्ही व्यक्तींच्या नावाचे आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट बोगस ग्राहकाच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅप द्वारे पाठवून दिले. यानंतर सदर रिपोर्टचे 4 हजार रुपये घेण्यासाठी कळंबोलीतील केएलई कॉलेज जवळ आलेल्या भंडारी याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड, प्रविण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे आणि त्यांच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, सदरचे रिपोर्ट त्याला संकेत कोरडे या लॅब टेक्निशीयनने दिल्याचे सांगितले. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी संजय भंडारी याच्यावर गुन्हा दाखल करुन लॅब टेक्निशीयन संकेत कोरडे याचा शोध सुरु केला आहे.
Comments