पनवेल आरटीओ कार्यालयात ३० एप्रिलपर्यंत प्रवेश बंदी....
पनवेल आरटीओ कार्यालयात ३० एप्रिलपर्यंत प्रवेश बंदी....
पनवेल / प्रतिनिधी ( संजय कदम ) -- सद्यस्थितीत नवी मुंबईसह, रायगड, पनवेल परिसरात झपाट्याने सुरू असलेल्या कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कळंबोली येथील आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयात 30 एप्रिलपर्यंत कोणालाही प्रवेश मिळणार नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये संबंधित अधिकारी यांच्या परवानगीने भेटायला येणाऱ्या व्यक्तींनी 48 तासाची आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत घेऊन येऊन अधिकारी यांना भेटता येणार असल्याचे फलक आरटीओ कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहे.
कळंबोली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल या कार्यालयामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, यास्तव प्रतिबंधात्मक तथा खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश जारी केले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्ती तथा लर्निंग लायसन्स, पक्की अनुज्ञप्ती चाचणी लायसेन्सची टेस्ट आदी कार्यालयीन कामकाज नियंत्रित केले, तरी गर्दी रोखणे सद्याच्या परिस्थितीत शक्य होत नाही. दरम्यान, पनवेल महापालिका तसेच रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यासह, पनवेल तालुक्यात  कलम 144 लागू करण्यात आलेले असून, त्यानुसार पाचपेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास तथा एकत्र जमा होण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आरटीओ कार्यालयात रोजच्या कामकाजासाठी येणाऱ्या अर्जदारांची संख्या खूपच अधिक असल्याने जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन होत असल्याचे परिवहन अधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे. याशिवाय, सद्यपरिस्थितीत प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलमध्ये अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची लागण होऊ नये याचीसुद्धा दक्षता कार्यालयीन अधिकारी घेत आहेतच. या वाढत्या कोरोनाच्या अनुषंगाने या वेळीच प्रतिबंध नाही केल्यास, कार्यालयातील  अधिकारी तथा कर्मचारी यांनाही संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. महत्वपूर्ण बाब म्हणजे, प्रस्तुत कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव नाही झाल्यास भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता संभवते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचवेळी, मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई तसेच अपर परिवहन आयुक्त, मुंबई, रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचेनुसार व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कळंबोली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल या कार्यालयामध्ये येणाऱ्यासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र महत्वाच्या कामासाठी आरटीओ कार्यालयामध्ये कोणत्याही अधिकारी यांना भेटण्यासाठी येण्याचे असेल तर त्या व्यक्तींनी 48 तासाची आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत घेऊन येऊनच अधिकारी यांच्या पूर्वपरवानगी त्यांना भेटता येणार असल्याचे फलक आरटीओ कार्याबाहेर लावण्यात आले आहे.
Comments