पनवेल, दि.22 (संजय कदम) ः कोव्हिड रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या समुपदेनासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे महाविकास आघाडीचे नगरसेवक रवींद्र भगत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या पनवेल तालुक्यामध्ये 45 हजार 150 रुग्ण आजपर्यंत मिळाले आहेत . मी मागील दोन तीन वेळा वेगवेगळया कोव्हिड रुग्णालयास भेट दिली असता असे अनुभव आले की , रुग्णांना अशावेळी मानसिक आधाराची गरज असते . नकारात्मक दृष्टीकोनातून जात असल्यामुळे त्यांना मानसिक आधाराची गरज आहे . अशा वेळी आपण समुपदेशनासाठी पालिकेने पाठपुरावा , उपाययोजना करावी . तसेच घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फोनद्वारे समुपदेशन व मानसिक आधार देण्यात यावे त्यासाठी पनवेल महानगरपालिका माध्यमातून सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्यात यावा . तसेच वरील विषयास अतितात्काळ निर्णय घेण्यात येउन अंमलात आणावे , अशी मागणी सुद्धा भगत यांनी केली आहे.