पनवेल दि.25 (वार्ताहर)- सरकारीकामात अडथळा आणणाऱ्या त्रिकूटाविरूद्ध खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून फोल्डींगचा चाकू, लोखंडी पट्टी, प्लॅस्टीकचा पाईप व तसेच त्यांच्याकडे असलेली मारूती सुझूकी असा मिळून जवळपास 4 लाख रूपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.
खारघर पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेले पोलिस नाईक सुनिल अंभुरे हे आपल्या अधिकारी वर्गासह कोरोना प्रादूर्भाव रोखण्या करीता खारघर परिसरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांविरूद्ध कारवाई करत असताना से.-29 सेंट्रल पार्क, खारघर येथील मोकळ्या मैदानात तीन जण संशयित रित्या फिरताना दिसून आल्याने त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलिस निरीक्षक विमल बिडवे यांनी त्यांच्या ताब्यात असलेली गाडीची झडती घेतली असता त्यात एक चाकू, प्लॅस्टिकचा पाईप व लोखंडी पट्टी मिळून आली. यावेळी त्या तिघांना पोलिस स्टेशनला चला असे सांगण्यात आले असताना ते तिघेही पोलिस नाईक अंभुरे यांच्या अंगावर धावून आले व आरडाओरडा करत पोलिस ठाण्यात येण्यास नकार दिला व त्यांच्याशी झोंबाझोंबी करून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून फरहान पटेल, भाईजी रफिक, अतिफ खान यांच्या विरूद्ध भादंवि कलम 353, 504, 506, 188, 34 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.