पनवेल मधील ज्वेलर्सचे दुकान फोडून ८ किलो ७२० ग्रॅम चांदीची चोरी...
पनवेल, दि.१२ (वार्ताहर) :-  अज्ञात चोरट्यांनी पनवेल मधिल कापड बाजारात असलेल्या आ.व्ही.पावस्कर हे ज्वेलर्सचे दुकान फोडून दुकानातील २ लाख ६० हजार रुपये किंमतीचे तब्बल ८ किलो ७२० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तु चोरुन नेल्याची घटना उघडकिस आली आहे. 
पनवेल शहर पोलिसांनी या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  
पनवेल मधील कापडबाजारात जयप्रकाश पावस्कर यांचे आर.व्ही.ज्वेलर्स नावाचे दुकान असुन त्यांचा वडीलोपार्जित चांदी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पावस्कर यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले होते. मात्र, चोरट्यांनी या दुकानाच्या पाठीमागील भाग तोडून दुकानात ग्राहकांना दाखविण्यासाठी शोकेसमध्ये ठेवण्यात आलेले ३ किलो ५२८ ग्रॅम वजनाचे चांदीचे कंबर चेन, ब्रेसलेट, १ किलो ६०० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, तसेच ३ किलो ५९२ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या १४ वाट्या, ६ ग्लास, ४ तुप भांडी, ४ लामणदिवे, २ द्रोण असा तब्बल २ लाख ६० हजार रुपये  किंमतीचा ऐवज चोरुन नेला. 

सकाळी जयप्रकाश यांचा मुलगा दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर  घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

फोटो :- आर.व्ही.पावस्कर ज्वेलर्स.Comments