शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा "संसद महारत्न" पुरस्काराने गौरव...

पनवेल / २० मार्च - देशातील प्रतिष्ठेचा समजल्या  जाणा-या 'संसद महारत्न' पुरस्काराने मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना आज (शनिवारी) गौरविण्यात आले.   मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांच्या हस्ते खासदार बारणे यांना  'संसद महारत्न' प्रदान करण्यात आला.

चेन्नई येथील प्राईम पाँईंट फाऊंडेशनच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात  आला. दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, प्राईम पाँईंट फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवासन, भावनेश देवरा, सुसन कोशी, प्रियदर्शनी आदी उपस्थित होते. खासदार बारणे यांच्यासोबत आठ जणांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्काराला उत्तर देताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ''लोकसभा मतदारसंघात काम करताना विविध  अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वसामान्य लोकांशी मिसळून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा आम्ही लोकप्रतिनिधी  प्रयत्न करत असतो. मतदारसंघातील प्रश्नांबाबत संसदेत आवाज उठवितो. सोळाव्या लोकसभेत मला सलग पाचवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केले. आज संसद महारत्न पुरस्कार देवून सन्मानित केले आहे''.

''मी सामान्य कुटुंबातील. माझ्या कुटुंबातील कोणी खासदार, आमदार, मंत्री नव्हते. सार्वजनिक जीवनात सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून काम केले. त्यांच्या सुख- दुःखात व  मदतीला धावून गेलो. मतदारसंघातील प्रश्न संसदेत मांडून ते सोडविण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशिल असतो.  माझे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मी  आभार मानतो. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याने जगातील सर्वांत मोठे लोकतंत्र असलेल्या देशातील संसदेत खासदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मावळ मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकून दोनवेळा त्यांची सेवा करण्याची संधी दिली. हा पुरस्कार माझ्या मायबाप मतदारांना समर्पित करतो'', असे खासदार बारणे म्हणाले
Comments