जागतिक महिला दिनाच्या औचित्याने पार पडला सन्मान सोहळा...


पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने केला महिला पत्रकारांचा सन्मान
पनवेल / प्रतिनिधी :- पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महिला पत्रकारांचा सन्मान रविवार दिनांक ७ मार्च रोजी करण्यात आला. मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर सोहळा संपन्न झाला. कोरोना विषाणू च्या दुसऱ्या लाटेचा विचार करता केवळ सदस्य आणि सत्कार मूर्ती एवढ्यांच्या निवडक संख्ये पुरताच हा कार्यक्रम मर्यादित ठेवण्यात आला होता.सदर कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
        
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा नेहमीच पनवेल तालुका पत्रकार विकास मंच गौरव करत आला आहे. विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सन्मान करत असताना पत्रकारिता क्षेत्रातील आपल्या भगिनिंचा सत्कार का करू नये?अशी भावना सदस्यांच्या मनामध्ये होती. पत्रकारिता क्षेत्रातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे, स्पर्धा तीव्र होत चालली आहे. वृत्तसमूह अथवा प्रतिनिधी पत्रकार या साऱ्यांनाच संघर्षमय कालखंडातून पत्रकारिता करावी लागत आहे. अशा खडतर परिस्थितीमध्ये महिला पत्रकारांना सासर, संसार ,अपत्ये या साऱ्यांच्या जोडीने लेखणी चालवावी लागते. आजच्या युगात पत्रकारिता करताना महिलांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. अशा संघर्षमय कालखंडात देखील आपल्या पत्रकारितेतून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिला पत्रकार भगिनींचा मंचाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
        
बारा वर्षे दैनिक किल्ले रायगडच्या डेस्कची जबाबदारी यशस्वीपणे हाताळणाऱ्या ज्योती दीपक सातारकर, कर्नाळा टीव्हीच्या उपसंपदिका चेतना गावंड वावेकर,दैनिक रामप्रहर च्या उपसंपादिका तन्वी अशोक गायकवाड,साम टिव्ही कर्नाळा टिव्ही अशा वृत्तसंस्थांमध्ये आपल्या प्रभावी अँकर चा ठसा उमटवल्यानंतर सध्या फ्रीलान्सर म्हणून कार्यरत असणाऱ्या तृप्ती संदीप पालकर, क्षितज पर्व च्या उपसंपादिका सुमेधा लिम्हण,मल्हार टिव्ही च्या वृत्त निवेदिका मेधावी घोडके,नूतन पाटील यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुमेधा लीम्हण उपस्थित न राहिल्याने त्यांचा पुरस्कार त्यांच्या प्रतिनिधीने स्विकारला.
          
मंचाचे सचिव मंदार दोंदे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संकल्पना मांडली तर अध्यक्ष माधव पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की एक महिला तिचे सासर आणि माहेर अशा दोन घरांचा उद्धार करत असते. परंतु आमच्या पत्रकार भगिनी मात्र दोन घरांच्या समवेत सुदृढ समाज व्यवस्थेसाठी देखील झगडत असतात. समाज सुधारण्यासाठी त्यांचे योगदान देखील मोलाचे आहे. आमच्या क्षेत्रात अनेक अडथळ्यांवर मात करून वृत्तसेवा देणाऱ्या या भगिनींचा मला अभिमान वाटतो.

प्रवीण मोहकर यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर दिपक घोसाळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
       
सत्कार मूर्तींचा शाल,सन्मानपत्र, वाचनीय पुस्तक, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, दैनंदिनी आणि हॅन्ड सेनीटायझर देऊन गौरव करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि हॅन्ड सॅनिटायझर पुरविण्यात आले होते.

या कार्यक्रमास पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे उपाध्यक्ष हरेश साठे,विवेक मोरेश्वर पाटील,संजय कदम, दिपक घोसाळकर, प्रवीण मोहोकर, अनिल कुरघोडे, राजू गाडे, सुनील राठोड, दत्ता मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

हेतुपुरस्सरपणे आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन जागतिक महिला दिनाच्या एक दिवस अगोदर केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतात सदर कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी आमच्या महिला पत्रकार भगिनींना देखील जावे लागते. अर्थातच ८ मार्च त्यांच्या साठी धावपळीचा दिवस असतो. म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या पुर्वदिनी आम्ही या कार्यक्रमाचे नियोजन केले.
माधव पाटील
अध्यक्ष: पनवेल तालुका पत्रकार विकास मंच.


Comments