पनवेल दि.२७ (वार्ताहर)- महिलांनी महिलांसाठी सुरू केलेल्या दिशा व्यासपीठाने स्त्री सबलीकरण व सक्षमीकरणासाठी ठोस पाऊल उचलले आहेत. व्यासपीठांतर्गत पंधरा स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम विकास आंधळे यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच कार्यकारिणीच्या बैठका सामाजिक अंतराने संपन्न झाल्या.
चूल आणि मूल या चौकटीतून सावित्रीच्या लेकीला बाहेर काढण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या सामाजिक संस्था काम करतात. कामोठे येथे महिलांनी महिलांसाठी तिचा उत्कर्ष आणि उद्धाराकरीता दिशा महिला मंचची स्थापना केली. या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. जनजागृती आणि प्रबोधन करून महिलांना सक्षम करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जात आहेत. विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या हिरकणींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली जाते. जागतिक महिला दिनाबरोबरच महिलांसाठी वर्षभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन दिशा च्या वतीने करण्यात येत आहे. या संस्थेने आपले वेगळेपण जपून ठेवले आहे. 'काही तरी सकारात्मक करू पण ते वेगळे आणि हटके करू' हे ध्येय धोरण ठरवून संस्थापिका निलम विकास आंधळे यांच्या नेतृत्वाखाली व्यासपीठाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. तीला पाठबळ, प्रेरणा ,प्रोत्साहन, देण्याबरोबरच महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे. आपल्या भगिनी आर्थिक दृष्ट्या सबल आणि सक्षम झाल्या पाहिजेत या भावनेतून दिशा व्यासपीठांतर्गत एकूण 15 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. या बचत गटांचे बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेत सुद्धा हे गट नोंदणीकृत झाले आहेत. त्यांना दिशा पूर्ती, प्रेरणा, समृद्धी, आकांशा, प्रगती, करूणा, भरारी, संकल्प,सखी,दामिनी,दर्शिका,रणरागिनी,हिरकणी,कोहिनुर, उन्नती अशी प्रेरणादायी नावे देण्यात आली आहेत. या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार देण्याचा उद्देश व्यासपीठाचा आहे. त्याचबरोबर सदस्य असलेल्या स्त्रियांना बचतीची सवय आणि महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने ही प्रयत्न करण्यात येणार आहेत. याअंतर्गत काही गृह उद्योग सुरू करण्याचा मानस दिशा महिला मंचच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.कोट-दिशा महिला बचत गट हे महिलांना एक प्रकारची संधी आहे.प्रत्येक वेळी नशीब मदत करेल या भावनेत न राहता. स्त्रियांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी संधी शोधणे आवश्यक आहे. महिलांमध्ये संवादकौशल्य, वेळेचे नियोजन, अर्थकारणाची सांगड, जबाबदारीची जाणीव, जोखीम स्वीकारण्याचे धाडस , परिस्थिती हाताळण्याची कला आहे. यशस्वी होण्याची क्षमता, नेतृत्व गुण, कामातील नीटसपणा, चोख व्यवहार या उपजत उद्योजकीय गुणांचा वापर योग्य पध्दतीने करून दिशा बचत गटातील महिला उद्योग क्षेत्रात नक्कीच आपले कर्तृत्व सिद्ध करतील. याकरीता आम्ही एकूण पंधरा बचत गटांची स्थापना केली आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण हा प्रमुख उद्देश आहे.निलम विकास आंधळे संस्थापिका दिशा महिला मंच
फोटोः दिशा महिला मंचा अंतर्गत महिला बचत गटाची स्थापना