बोगस कंपनी चालविणारा व्यक्ती अटकेत
पनवेल दि.२० (वार्ताहर): कोणत्याही प्रकारच्या मालाची देवाण घेवाण न करता, वस्तु व सेवा कराची खोटी बिले सादर करुन तब्बल ५.८८ कोटी रुपयांचा परतावा मिळवून सरकारची फसवणुक करणाऱया कळंबोलीतील मेसर्स सनराइझ ट्रेडर्स या कंपनी विरोधात केंद्रीय वस्तू व सेवा कर रायगड विभागाने कारवाई करुन सदरची बोगस कंपनी चालविणाऱया मंसूर बेग अहमद बेग मोगल याला अटक केली आहे. केंद्रीय वस्तू व सेवा कर रायगड विभागाची गत महिन्याभरातील दुसरी कारवाई आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या मंसूर बेग अहमद बेग मोगल याने २०१९ मध्ये मेसर्स सनराइझ ट्रेडर्स नावाने बोगस कंपनी तयार करुन त्याद्वारे मेटल स्क्रॅप खरेदी विक्री करत असल्याचे दाखविले होते. तसेच सदर कंपनीचा पत्ता कळंबोली स्टील मार्केटमध्ये असल्याचे दाखविले होते. दरम्यान,केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाने खोटी बिले सादर करुन परतावा मिळविणाऱया कंपन्या व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे.
या शोध मोहिमेदरम्यान, मेसर्स सनराइझ ट्रेडर्स या कंपनीचे मागील तीन महिन्याच्या कालावधीत १० ते १५ कोटीचे व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्रीय वस्तू व सेवा कर रायगड विभागाने या कंपनीच्या व्यवहारांची तपासणी केली असता, सदर कंपनीने ज्या व्यक्तीकडून माल विकत घेतल्याचे दाखविले होते, तो सप्लायर देखील बोगस असल्याचे आढळुन आले.
त्यानंतर केंद्रीय वस्तू कर विभागाने मंसूर बेग याच्या कळंबोली येथील कार्यालयाच्या पत्यावर जाऊन पहाणी केली असता, सदर ठिकाणी फक्त १५० फुटाचा छोटा गाळा असल्याचे त्याठिकाणावरुन कुठल्याही प्रकारचा व्यापार चालत नसल्याचे आढळुन आले. त्यानंतर सदर कंपनीने कोणत्याही प्रकारच्या मालाची देवाण-घेवाण न करता, खोटी बिले सादर करुन सुमारे 5.88 कोटी रुपयांचा परतावा प्राप्त केल्याचे केंद्रीय वस्तू व सेवा कर रायगड विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे केंद्रीय जीएसटीच्या पथकाने मंसूर बेग याचा कुर्ला येथील पत्त्यावर शोध घेतला असता, त्याठिकाणी तो राहात नसल्याचे आढळुन आले. त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्याला गोरेगाव येथून अटक करण्यात आल्याची माहिती सीजीएसटी रायगड विभागाचे उप आयुक्त बी.एल.रेड्डी यांनी दिली. दरम्यान, केंद्रीय वस्तू व सेवा कर रायगड विभागाने पंधरा दिवसापुर्वी खोटी बिले सादर करुन 19.2 कोटी रुपयांचा परतावा मिळविणाऱया सीएला अटक केली होती. त्यानंतर ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.
चौकट
खोटी बिले सादर करुन परतावा मिळविणाऱया कंपन्या व व्यक्ती विरोधात केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाने जोरदार मोहीम उघडली असून अशा प्रकारचे बनावटगीरीचे प्रकार थांबविण्यासाठी सीजीएसटी विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. असले प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रत्येक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या आयुक्त मनप्रीत अरोरा यांनी सांगितले.