घरकामासाठी ठेवण्यात आलेल्या १२ वर्षीय मुलाची कामगार विभागाकडून सुटका ..

पनवेल, दि.११ (वार्ताहर) :-  रायगडच्या कामगार विभागाने कळंबोलीतील एका घरावर धाड टाकून घरकामासाठी ठेवलेल्या एका १२ वर्षीय मुलाची सुटका केली आहे. तसेच सदर मुलाला घरकामासाठी जुंपणार्‍या घर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुटका करण्यात आलेला १२ वर्षीय मुलगा हा उत्तरप्रदेश राज्यातला असून त्याला शिक्षणाच्या बहाण्याने त्याच्या मुळ गावावरुन आणून त्याला घरकामासाठी ठेवल्याचे चौकशीत आढळून आले आहे.  

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव ग्यान गुरुप्रकाश सिन्हा असे असुन तो कळंबोली रोडपाली सेक्टर-२० मधील रत्ना इन्क्लेव्ह या इमारतीत पहिल्या मजल्यावर राहण्यास आहे. गत जानेवारी महिन्यामध्ये ग्यान सिन्हा याने उत्तर प्रदेश राज्यातून एका १२ वर्षाच्या मुलाला आपल्या घरी आणून ठेवले होते. ग्यान सिन्हा व त्याची पत्नी सदर मुलांकडून घरातील सर्व प्रकारची कामे करुन घेत होते. अशा पद्धतीने या अल्पवयीन मुलाचे शोषण होत असल्याचे काही जागरुक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर एका जागरुक नागरिकाने खारघर मधील युवा संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या १०९८ या हेल्पलाईनवर फोन करुन याबाबतची माहिती दिली होती. तसेच सदर मुलाची  सुटका करण्याची सुचना केली होती.  युवा संस्थेच्या चाईल्ड लाईन हेल्पलाईनने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ याबाबतची माहिती रायगडच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकार्‍यांना दिल्यानंतर जिल्हा माहिला व बालविकास अधीकार्‍यांनी पनवेल येथील कामगार उपायुक्तांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले हेत. त्यानुसार सरकारी कामगार अधिकारी स्नेहल माटे, दुकाने निरीक्षक सुनिल आव्हाड, बाल संरक्षण कक्षाचे क्षेत्रीय कार्यकर्ता अविनाश बधे, दशरथ चौधरी यांच्या पथकाने कळंबोली पोलिसांच्या सहकार्याने रोडपाली येथील ग्यान सिन्हा याच्या घरावर धाड मारुन त्यांच्या घरामध्ये घरकामासाठी ठेवलेल्या १२ वर्षीय मुलाची सुटका केली. सदर मुलाकडून ग्यान सिन्हा व त्याची पत्नी घरातील सर्वप्रकारची कामे करुन घेत असल्याचे सदर मुलाच्या चौकशीत आढळुन आले आहे. त्यानुसार ग्यान सिन्हा याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात किसोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Comments