द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या २० व्या युवा महोत्सवाचा शानदार प्रारंभ...
 उरण / वार्ताहर :- बुधवार दि ३ रोजी बोकडविरा ता.उरण येथील नवी मुंबई सेझ मैदानावर द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या २० व्या युवा महोत्सवाचा शानदार प्रारंभ झाला.

कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धा असलेल्या या युवा महोत्सवाचे उद्घाटन क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले.
उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत,  वहाळ साईमंदिरचे रविशेठ पाटील , उरण तालुका काँग्रेस नेते मिलिंद पाडगावकर, पनवेल महानगरपालिका काँग्रेस अध्यक्ष आर सी घरत, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ मनीष पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशालीताई घरत ,उरण तालुका आय काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नवीन पिढीला घडविणाऱ्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांचे अभिनंदन केले.सध्याचा युवा वर्ग दिवसातील ७ ते ८ तास फेसबुक आणि व्हाट्स अँप वर असतो.मोबाईल मध्ये गुरफटलेल्या युवकांनी खेळ खळावे असे आवाहन त्यांनी केले.

उरण तालुक्यासाठी, द्रोणागिरी स्पोर्ट्ससाठी नक्कीच क्रीडांगण उपलब्ध करून देईन असे आश्वासन  देऊन त्याच्या भूमिपूजन सोहळ्यास मी येईन असेही ते म्हणाले. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही द्रोणागिरी स्पोर्ट्सला हक्काचे मैदान लवकरच मिळावे अशी मागणी केली.नजीकच्या काळात उरणचे खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतील असा आशावाद अध्यक्ष महादेव घरत यांनी व्यक्त केला.
सर्वप्रथम करंजा येथील द्रोणागिरी देवीच्या मंदिरातून निघालेली क्रीडाज्योत मैदानात आली.ध्वजारोहण झाले. खेळाडूंनी शपथ घेतली. यावेळी मोनिका गोळे हिने लाठीकाठी, तलवार आणि  दांडपट्ट्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायदळाचे प्रमुख सरनौबत पिलाजी गोळे यांचे वंशज दुर्गअभ्यासक ऍड मारुती गोळे, छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई धाराऊ माता यांचे वंशज अमित गाडे पाटील , नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ शीतल मालुसरे , सिने अभिनेता योगेश अवसरे, सिने अभिनेता महेश खुटे ,दारवली गावचे मुलकी पाटील पै. सागर थरकुडे पाटील कोकाकोला कंपनी चे मॅनेजर जि बी माने  तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तीना द्रोणागिरीभूषण  आणि कोरोना काळात जीवाची पर्वा न करता समाजसेवा करणाऱ्याना मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी केले.
२० वर्षापूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. रामायण काळात लक्ष्मणाला द्रोणागिरी पर्वतातून संजीवनी प्राप्त झाली होती . उरणच्या क्रीडाक्षेत्राला द्रोणागिरी स्पोर्ट्स च्या माध्यमातून संजीवनी प्राप्त होईल. 
सदर युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे शिवेंद्र म्हात्रे,मनोज पडते, भरत म्हात्रे, विजय पाटील, रोहन घरत, नयन पाटील,दिलीप तांडेल, नरेश म्हात्रे, प्रसाद पाटील,जयेश पाटील, संदीप घरत याचबरोबर अन्य सदस्य आणि महिला विभाग विशेष मेहनत घेत आहेत.

Comments