आसूडगाव बस स्थानकाजवळ सराईत गुन्हेगाराला अग्निशस्त्रासह गुन्हे शाखा कक्ष -२ ने केली अटक ..
आसूडगाव बस स्थानकाजवळ सराईत गुन्हेगाराला अग्निशस्त्रासह केली अटकगुन्हे शाखा कक्ष-२ ने सापळा रचून केली कारवाई

तळोजा कारागृहातुन सुटकेनंतर आरोपी अग्निशस्त्रासह येणार असल्याची पोलिसांनी मिळाली माहिती

पनवेल दि.१० (संजय कदम): नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार विनोदकुमार राजभर (वय ३५)  जानेवारी २०२० मध्ये एक वर्ष शिक्षा भोगून तळोजा कारागृहातून सुटला आहे. सदरचा आरोपी आज (१० मार्च) पनवेल परिसरातील आसुडगाव बस स्थानकाजवळ अग्निशस्त्रांसह येणार असल्याची खात्रीशीर बातमी गुन्हे शाखा कक्ष-२ पनवेल चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळाली. त्या अनुषंगाने नवी मुंबई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. शेखर पाटिल, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रवीण पाटिल, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव रोंगे, पोहवा अनिल पाटिल, साळूंखे, रणजित पाटिल, प्रमोद पाटिल, पोलीस नाईक डोंगरे, प्रफूल मोरे यांच्या पथकाने सापळा रचला.            
त्यानंतर अत्यंत शिताफीने सदरच्या आरोपीला खांदा कॉलनी जवळील आसूडगाव बस स्थानक येथून गुन्हे शाखा कक्ष-२ च्या टीमने ताब्यात घेतले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, ८ एमएम व ३२ एमएम चे असे दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सदरच्या गुन्हेगारा विरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीचे पूर्ण नाव विनोद कुमार तुफानी राजभर असे असून नवी मुंबईतील सानपाडा येथील सेक्टर ५ याठिकाणी असणाऱ्या शंकर मंदिराजवळील झोपडपट्टी तो राहत होता. आरोपीचा यापूर्वीचा क्राईम रेकॉर्ड तपासला असता यापूर्वी देखील  आरोपीविरुद्ध सानपाडा पोलीस ठाणे, ट्रॉम्बे पोलीस ठाणे याठिकाणी विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच आरोपीने यापूर्वी केलेल्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये १ वर्षाच्या श्रम करावासाची शिक्षा भोगून जानेवारी २०२० मध्ये बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.         

फोटोः आरोपी व हस्तगत केलेलीअग्निशस्त्रे
Comments