पनवेल, दि.२६ (संजय कदम) ः एका भामट्याने एक महिन्याच्या भाडेतत्वावर घेतलेली महिंद्रा स्कॉर्पीओ कार परस्पर दुसर्याला विवून कार मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इब्राहिम शेख असे या भामट्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार योगेश पाटील खारघर भागात राहण्यास असून त्याने ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याच्या ओळखीतील सुरज थोरात याच्या मालकीची पांढर्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पीओ भाड्याने चालविण्यासाठी घेतली होती. त्यावेळी जस्ट डायल वरुन इब्राहिम शेख या भामट्याने योगेश पाटील याला संपर्क साधून त्याची स्कॉर्पीओ एक महिन्यासाठी 30 हजार रुपये भाड्याने देण्याबाबत बोलणी केली. त्यानंतर काही दिवसानंतर इब्राहिम शेख याने खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉल जवळ आला होता. यावेळी योगेश पाटील याची भेट घेऊन लॅपटॉपच्या व्यवसायासाठी त्याची स्कॉर्पीओ 1 महिन्यासाठी भाडेतत्वावर देण्याची त्याने मागणी केली. यावेळी त्याने आपले आधारकार्ड, लाईटबिल आणि फोटो तसेच अॅडव्हान्स 30 हजार रुपये योगेशला देऊन त्याच्या ताब्यातील स्कॉर्पीओ घेऊन पलायन केले. एक महिन्यानंतर योगेशने इब्राहिमच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याने त्याचे फोन घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे योगेशने कारमध्ये लावलेल्या जीपीएस यंत्रणेद्वारे कारचे लोकेशन शोधले असता, त्याची स्कॉर्पीओ भुसावळ येथे असल्याचे त्याला समजले. त्यामुळे योगेशने भुसावळ येथे जाऊन कारबाबत माहिती घेतली असता, कार मिरा-भाईंदर येथील मुस्ताफा याच्याकडून विकत घेतल्याचे त्याला सांगण्यात आले. भामट्या इब्राहिम शेख याने अशा पध्दतीने योगेश पाटील याची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी इब्राहिम शेख याच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.