पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या अध्यक्षपदी रत्नाकर पाटील...
ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या पहिल्या अध्यक्षपदी रत्नाकर पाटील..

पनवेल : पनवेल तालुका पत्रकार महासंघाची स्थापना २ फेब्रुवारी २०२१ रोजी सुनील पोतदार यांनी केली. त्यावेळी पत्रकार संघर्ष समितीच्या ९९% सदस्यांनी पत्रकार संघर्ष समितीचे राजीनामे देऊन सुनील पोतदार यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे पत्रकार संघर्ष समिती बरखास्त करण्याचा निर्णय रत्नाकर पाटील यांनी घेतला. 

सुनील पोतदार आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे ज्येष्ठ सल्लागार दैनिक किल्ले रायगड चे संपादक प्रमोद वालेकर यांनी लवकरच पनवेल तालुका पत्रकार महासंघाची बैठक बोलावून नवीन कार्यकारणी व पदाधिकारी निवडण्याचा निर्णय घेतला जाईल असे घोषित केले होते. त्या घोषणेप्रमाणे मंगळवार दि.९ फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृहात रायगड नगरीचे मुख्य संपादक तथा महासंघाचे निमंत्रक सुनील पोतदार आणि दैनिक किल्ले रायगडचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद वालेकर यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. 

या बैठकीत महासंघाचे सदस्य व आर्या प्रहारचे संपादक सुधीर पाटील यांनी सुनील पोतदार व प्रमोद वालेकर यांनी कार्यकारणी जाहीर करावी असा ठराव मांडला त्यास दैनिक मुंबई चौफेरचे प्रतिनिधी अरविंद पोतदार यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे हा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यामुळे सुनील पोतदार व प्रमोद वालेकर यांनी पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या कार्यकारिणीची घोषणा केली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून रायगड शिवसम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, उपाध्यक्षपदी दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दीपक घोसाळकर, सचिव पदी दैनिक लोकमतचे प्रतिनिधी मयूर तांबडे, खजिनदारपदी आर्या प्रहारचे संपादक सुधीर पाटील तर प्रसिद्धी प्रमुखपदी दैनिक रामप्रहरचे प्रतिनिधी नितीन देशमुख यांची नेमणूक करण्यात आली.

महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये मुंबई चौफेरचे प्रतिनिधी अरविंद पोतदार, दैनिक रायगड नगरीचे संपादक राकेश पितळे, दैनिक किल्ले रायगडचे प्रतिनिधी प्रदीप वालेकर, रसायनी टाईम्सचे संपादक अनिल भोळे, पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरघोडे, वतन कर्नाळाचे प्रतिनिधी चंद्रशेखर भोपी यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीसाठी दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, रायगड शिवसम्राटचे प्रतिनिधी सुभाष वाघपंजे, दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी राजेश डांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित अध्यक्ष रत्नाकर पाटील म्हणाले की, पनवेल तालुका पत्रकार महासंघाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो सामाजिक उपक्रम राबवून सार्थ करुन दाखविल, तसेच जेष्ठ सल्लागार, महासंघाचे पदाधिकारी आणि सन्मानिय सदस्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी विचारविनिमय करुनच कार्यक्रमाची रुपरेषा ठरवू, अशी ग्वाही दिली.
Comments