पनवेल / वृत्तसेवा :- पेण प्रायव्हेट हायस्कूल पेणच्या १९६८ साली, मॅट्रिक झालेल्या विद्यार्थी मित्रांचा स्नेहमेळावा ७ फेब्रुवारी रोजी सिद्ध समाधी योग आश्रम, खोपोली, येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
२०१७ साली पहिला मेळावा पेण येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळा सोडल्या नंतर पन्नास वर्षात कधीही न भेटलेल्या, ४० वर्ग मित्रांची प्रथमच गाठ भेट झाली. या मध्ये १५ वर्ग मैत्रिणींचा ही समावेश होता. बडोदा, पुणे ,मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग येथे राहणारे हे वर्गमित्र एकमेकांच्या ओढीने एकत्र आले होते. त्यानंतर दरवर्षी विविध ठिकाणी हे स्नेहसंमेलन संपन्न झाले. सात फेब्रुवारी रोजी खोपोली येथे आयोजित या चौथ्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ऍडव्होकेट श्रीकांत पाटणकर, यांच्या हस्ते करण्यात आले. या स्नेहसंमेलनाला ३८ मित्र-मैत्रिणींनी आपला सहभाग नोंदविला. या स्नेहसंमेलनात पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार आनंद देवधर यांनी आपल्या कलाकृती आणि सुप्रसिद्ध व्यक्तीं बरोबर झालेल्या गाठीभेटी यासंबंधीच्या आठवणींचे एक पुस्तक तयार केले आहे. तसेच पत्रकार रमेश भोळे यांनी साईंचे सोबती हे पुस्तक लिहिले आहे या दोघांचा सत्कार यावेळी त्यांच्या मित्रांनी केला. खोपोलीचे वर्गमित्र वालचंद ओसवाल, आशा दामले, सुरेन जाधव, शांतीलाल पूनमिया, लक्ष्मण पाटील, यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. पुढील स्नेहसंमेलन विजय वनगे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करून, कार्यक्रमाची मोठ्या आनंदाने सांगता करण्यात आली.