नेरे हायस्कूलमध्ये ‘मॉडेल स्कूल डेव्हलपमेंट प्रकल्पा’ चे उद्घाटन...
नेरे हायस्कूलमध्ये ‘मॉडेल स्कूल डेव्हलपमेंट प्रकल्पा’ चे उद्घाटन...
पनवेल / प्रतिनिधी : -
परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (MCX) यांच्या CSR उपक्रमांतर्गत नेरे हायस्कूल, नेरे येथे राबविण्यात आलेल्या ‘मॉडेल स्कूल डेव्हलपमेंट प्रकल्पा’चे उद्घाटन आज MCX च्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती प्रवीणा राय यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जनसेवा संघाचे अध्यक्ष मा. श्री.अरुण मुळे यांनी भूषविले. शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

या प्रकल्पांतर्गत परिवर्तन फाउंडेशनने शाळेचे संपूर्ण नूतनीकरण व डिजिटायझेशन केले. स्वच्छ विद्यालय मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुले, मुली, दिव्यांग विद्यार्थी व शिक्षकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात आली, तर जलशुद्धीकरण यंत्रणेची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. शाळेतील सर्व वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या असून डिजिटल आयटी लर्निंग प्रणाली व डिजिटल पॅनल्स बसविण्यात आले आहेत. नवीन छप्पर, फरशी, फॉल्स सिलिंग, रंगरंगोटी, आवश्यक फर्निचर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत व नवीन प्रवेशद्वार उभारून शाळेचा कायापालट करण्यात आला असून शाळेच्या मागील भागाचेही पुनरुज्जीवन करण्यात आले. संपूर्ण विद्युत व्यवस्था, पंखे व दिवे, थ्री-फेज वीजजोडणी आणि 10 किलोवॅट सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी व्हॉलीबॉल मैदान, लांब उडी व उंच उडीचे पिट, थाळीफेक व गोळाफेक, तसेच कबड्डी व खो-खोचे मैदान विकसित करण्यात आले असून घनकचरा व्यवस्थापनासाठी पिटही तयार करण्यात आला आहे. याशिवाय शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आले.

याचा परिणाम म्हणून यंदाच्या वर्षीच शाळेची पटसंख्या 42 ने वाढली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या कमी होत असताना ही मोठी उपलब्धी आहे. विद्यार्थी विविध विषयांमध्ये तसेच शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालयासारख्या प्रवेश परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी करू लागले आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक डिजिटल शाळांपैकी एक असलेल्या या शाळेची विद्यार्थीसंख्या आणखी वाढेल आणि संख्येसोबतच शैक्षणिक गुणवत्ताही सुधारेल, असा विश्वास परिवर्तन फाउंडेशनने व्यक्त केला.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन झाले. मान्यवरांनी शाळा परिसराची पाहणी करून वृक्षारोपण केले. सभागृहातील कार्यक्रमात दीपप्रज्वलन, विद्यार्थ्यांचे स्वागतगीत, सत्कार व मनोगते झाली. परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश इंगळे यांनी प्रकल्पाची माहिती देऊन ही दीर्घकालीन बांधिलकी असल्याचे सांगितले. श्रीमती प्रवीणा राय यांनी शुभेच्छा देत प्रकल्पाची भूमिका मांडली आणि या प्रकल्पाचे खरे यश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतून दिसले पाहिजे, असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी प्रकल्पाचे कौतुक करून ही शाळा संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी मॉडेल स्कूलचे उत्कृष्ट उदाहरण बनावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रकल्पाच्या यशात जनसेवा संघाचे अध्यक्ष मा. श्री. अरुण मुळे, नेरे शाळेचे अध्यक्ष मा. श्री. दत्ता पाटील, जनसेवा संघाचे उपाध्यक्ष श्री. बाळकृष्ण शिवा गवते, विश्वस्त श्री. राजेंद्र पाटील व श्री. प्रकाश मस्कर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी परिवर्तन फाउंडेशनला आवश्यक ती सर्व मदत केल्यामुळे विक्रमी वेळेत काम पूर्ण होऊन अत्यंत कमी कालावधीत शाळा पूर्णपणे कार्यान्वित झाली. परिवर्तन फाउंडेशनच्या कोषाध्यक्ष सौ. सुषमा शिरसाड यांनी प्रकल्प यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मुसळधार पावसासारख्या हंगामी अडचणी व अनेक आव्हाने असूनही श्री. आनंद हडोळतीकर व श्री. सुरज मौर्य यांनी कमी कालावधीत परिसर कार्यान्वित करण्याचे उत्कृष्ट काम केले. सौर ऊर्जा, आयटी वर्गखोल्या व डिजिटल पॅनल्ससाठी श्री. गिरीश खैरनार व श्री. दीपक कोटकर यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन. एस. पाटील सर यांनी केले. संपूर्ण शाळेच्या सुशोभीकरणाची जबाबदारी आणि कार्यक्रमाची संपूर्ण धुरा शिक्षकवृंदाने सांभाळली. कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता.

या वेळी MCX च्या वतीने CSR विभागाचे फंक्शनल हेड मा. श्री. मुकेश जयस्वाल, श्री. आलोक सिंह व श्री. राहुल साठे; जनसेवा संघाच्या वतीने श्री. नामदेव फडके; तसेच परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश इंगळे, कोषाध्यक्ष सौ. सुषमा शिरसाड, विश्वस्त श्री. राजेश कोठ आणि टीम सदस्य श्री. सुरज मौर्य, श्री. राज संतोष, श्री. अजय जे. शर्मा, श्री. हेमंत सामंत, डॉ. कमलेश व श्री. रवींद्र जाधव उपस्थित होते. मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments