हावरे सोसायटीतील पाणीटंचाईचा प्रश्न ३ ते ४ दिवसांत सुटणार! शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठपुराव्याला यश ; सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन
हावरे सोसायटीतील पाणीटंचाईचा प्रश्न ३ ते ४ दिवसांत सुटणार!
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठपुराव्याला यश ; सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन

पनवेल, दि.४ (वार्ताहर) : कामोठे वसाहतीमधील सेक्टर २२, प्रभाग क्रमांक ११ येथील हावरे सोसायटीतील गंभीर पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुढाकार घेतला आहे. गेल्या काही काळापासून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या रहिवाशांच्या समस्येबाबत पक्षाचे पनवेल महानगरप्रमुख ॲड. समाधान काशीद यांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सूर्यवंशी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी येत्या तीन ते चार दिवसांत पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले.
हावरे सोसायटीमध्ये सध्या प्रत्येक व्यक्तीमागे दररोज केवळ ७० ते ८० लिटर पाणी उपलब्ध होत आहे. सोसायटीची दैनंदिन पाण्याची गरज भागविण्यासाठी दररोज किमान १० पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा अपुरा पडत असून रहिवाशांना स्वतःच्या खिशातून अतिरिक्त पैसे खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. परिणामी नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह दररोज पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान १३० ते १५० लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी ठाम मागणी सिडको प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, अपुऱ्या पाण्यामुळे रहिवाशांना होणारा त्रास आणि टँकरवरील वाढता खर्च याबाबत कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर मनोज सूर्यवंशी यांनी येत्या तीन ते चार दिवसांत पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल महानगरप्रमुख ॲड. समाधान काशीद, हावरे सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पाटील, संचालक मंडळाचे सदस्य रमेश दाभोलकर, सोसायटीचे सभासद संजय घाडीगावकर व अरुण सावंत तसेच शाखाप्रमुख अक्षय संजय ननावरे उपस्थित होते.
हावरे सोसायटीतील रहिवाशांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर समाधान न मानता पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे ॲड. समाधान काशीद यांनी स्पष्ट केले. सिडको प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार तीन ते चार दिवसांत प्रत्यक्ष पाणीपुरवठ्यात सुधारणा होते का, याकडे आता हावरे सोसायटीतील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.


फोटो : सिडको निवेदन
Comments
Popular posts
शिवसेना नेते मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते पनवेलमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवाळी सुगंधी उटण्याचा शुभारंभ...
Image
कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरे वाडीतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत ; पनवेलचे शिवसैनिक राहुल गोगटे यांचा पुढाकार
Image
वैश्य युवा सामाजिक संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ; खोपोलीत विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
Image
पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन..
Image
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी - व्यवसायाचा मार्ग मोकळा ; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या बैठकीत महत्त्वाचे आश्वासन...
Image