महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप ; १ लाख रोजगार निर्मिती
महापेत दागिने उद्योगाचे नवे जागतिक केंद्र उभे राहणार
नवी मुंबई (महापे), २६ ऑक्टोबर २०२६: महाराष्ट्राला जागतिक दागिने उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनविण्याच्या दृष्टीने महापे येथे ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी या प्रकल्पाचा शुभारंभ झाला.
महापे येथील २२ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या पार्कमध्ये दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स उभारण्याचे उद्दिष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि जागतिक बाजारपेठेतील संधींच्या बळावर महाराष्ट्राला दागिने उद्योगात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
देशाच्या एकूण रत्न व आभूषण निर्यातीपैकी ५० टक्क्यांहून अधिक निर्यात महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबईतून होते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या प्रकल्पामुळे नवी मुंबईचे जागतिक औद्योगिक महत्त्व वाढण्यासोबतच रोजगारनिर्मिती आणि निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.