जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सतर्फे मोफत हिपॅटायटिस बी तपासणी शिबिर
सिप्लाच्या सहकार्याने ५०० पर्यंत मोफत हिपॅटायटिस बी तपासण्या ; लवकर निदान आणि जनजागृतीवर भर
नवी मुंबई /पनवेल वैभव वृत्त :
जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सने सिप्लाच्या सहकार्याने रुग्णालयातील वेलनेस लाउंजमध्ये हिपॅटायटिस बी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत सिप्लातर्फे जवळपास ५०० हिपॅटायटिस बी संबंधीत तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. तपासणीची जबाबदारी सिप्लाने सांभाळली असून, मेडिकव्हर हॉस्पिटल्सने शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सुविधा व सहकार्य उपलब्ध करून दिले. रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, कंत्राटी कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांना या मोफत तपासणीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
हिपॅटायटिस बी हा आजही गंभीर सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्न असून बऱ्याचदा या संसर्गाचे उशिराने निदान होते. हा आजार हिपॅटायटिस बी विषाणूमुळे होतो आणि मुख्यतः यकृतावर परिणाम करतो. संसर्ग झालेल्या रक्त किंवा शारीरिक द्रवांच्या संपर्कातून, संक्रमित आईकडून बाळाला प्रसूतीदरम्यान, असुरक्षित इंजेक्शन, दूषित सुया तसेच असुरक्षित लैंगिक संबंधांमधून हा संसर्ग पसरू शकतो.
हिपॅटायटिस बी ची सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र काही रुग्णांमध्ये सतत थकवा येणे, ताप, मळमळ, भूक न लागणे, पोटात अस्वस्थता, गडद रंगाची लघवी तसेच त्वचा आणि डोळे पिवळे पडणे (कावीळ) यांसारखी लक्षणे दिसू शकतात. वेळीच निदान व उपचार न झाल्यास हा आजार दीर्घकालीन यकृतविकार, लिव्हर सिरोसिस, यकृत निकामी होणे किंवा यकृताच्या कर्करोगापर्यंत गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
या तपासणी शिबिराचा उद्देश हिपॅटायटिस बीविषयी जनजागृती करणे, नागरिकांना स्वतःची संसर्गस्थिती जाणून घेण्यासाठी तपासणीस प्रोत्साहन देणे आणि आवश्यकतेनुसार वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्यास प्रवृत्त करणे हा आहे. यासोबतच सहभागी नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व, स्वच्छतेच्या सवयी आणि नियमित आरोग्य तपासणीबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
यावेळी बोलताना मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल म्हणाले, मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि लवकर निदान यांना आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो. या हिपॅटायटिस बी तपासणी शिबिराद्वारे कर्मचारी आणि समाजातील नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जागतिक हिपॅटायटिस दिन हा अनेक लोक हिपॅटायटिस बी संसर्गासह जगत असतानाही त्यांना त्याची माहिती नसल्याची जाणीव करून देणारा महत्त्वाचा दिवस आहे. वेळीच तपासणी आणि जनजागृतीच्या माध्यमातून वेळीच निदान होऊन यकृतविकारांचा दीर्घकालीन भार कमी करण्यास मदत होईल, अशी आम्हाला आशा आहे.
मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघरचे सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले, अशा प्रकारचे सामुदायिक आरोग्य उपक्रम जनजागृती वाढविण्यास आणि नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत सजग बनविण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. सिप्लाच्या सहकार्याने मोफत हिपॅटायटिस बी तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी माहिती देण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. प्रत्येकाने आपल्या यकृताच्या आरोग्याला प्राधान्य देऊन वेळोवेळी तपासणी करून घ्यावी.