पनवेल वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना वेळेत उपचार
पनवेल , दि.०४ ( वार्ताहर ) : पनवेल शहराजवळील शिवशंभू सिग्नल येथे कर्तव्य बजावत असताना पोलीस हवालदार अमीर मुलाणी व पोलीस शिपाई सुरेश जोंजाळ यांना वाहनचालक नागरिकामार्फत गाढी नदी पुलावर मोटरसायकलचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. अपघातात दोन व्यक्ती जखमी होऊन रस्त्यावर पडल्याचे समजताच दोन्ही पोलीस अंमलदारांनी कोणताही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यावर जखमी व्यक्ती रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना सुरक्षितपणे उचलून ॲम्बुलन्सची प्रतीक्षा न करता तेथून जाणाऱ्या ऑटो रिक्षामध्ये बसविले. व स्वतः जखमींसोबत उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे गेले व त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले.व पुढील कारवाईसाठी पनवेल शहर पोलीस स्टेशन यांना माहिती देण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांना तात्काळ देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी अतिरिक्त अंमलदार पाठवून वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या तसेच जखमींना आवश्यक ती मदत व उपचार मिळतील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले. वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधान, तत्परता आणि मानवतावादी भूमिकेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले. या कार्याबद्दल नागरिकांकडून वाहतूक पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
फोटो - जखमी व्यक्ती