लोकनेते रामशेठ ठाकूर यांची न्यू कॉलेज, कोल्हापूरला २५ लाखांची देणगी...
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची न्यू कॉलेज, कोल्हापूरला २५ लाखांची देणगी


पनवेल (प्रतिनिधी)  सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने योगदान देणारे दानशूर व्यक्तीमत्व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल २५ लाख रुपयांची भरघोस देणगी जाहीर केली आहे.
गुरुवारी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात या मदतीचा धनादेश बोर्डिंगचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. अशोक भोईटे, ॲड. राहुल घरत तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग आणि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कार्याचा उल्लेख केला. शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची किल्ली असून गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे, या भूमिकेतून त्यांनी ही मदत जाहीर केली असल्याचे सांगण्यात आले.
न्यू कॉलेजच्या वाढत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता नव्या इमारतीची आवश्यकता भासत होती. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिलेल्या २५ लाख रुपयांच्या मदतीमुळे बांधकामाच्या कामाला मोठी गती मिळणार असून विद्यार्थ्यांना प्रशस्त वर्गखोल्या, अत्याधुनिक सुविधा आणि उत्तम शैक्षणिक वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यापूर्वीही विविध शैक्षणिक संस्था, क्रीडा उपक्रम, सामाजिक कार्यक्रम आणि आपत्तीग्रस्तांना मदत करून समाजातील विविध घटकांना भक्कम आधार दिला आहे. त्यांच्या या योगदानामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवे बळ मिळाले आहे.
या उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Comments