हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक ; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप....
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक ; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप....


पनवेल  / दि. ११ ( वार्ताहर ) : नवीन पनवेल पूर्वेकडील पंचशील नगर झोपडपट्टी परिसरात हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटीची वायर तुटल्याने अचानक भीषण आग लागली. आज दुपारच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही मिनिटांतच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आग वेगाने पसरत असल्याने अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
                     आगीची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस, वाहतूक शाखा, महावितरण अधिकारी आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तत्काळ पाण्याचे फवारे मारत आग नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. गॅस सिलेंडर आणि इतर ज्वलनशील पदार्थांच्या उपस्थितीमुळे आग अधिक धोकादायक बनण्याची शक्यता होती. अग्निशामक कर्मचारी सतर्क राहून आगीवर नियंत्रण मिळविण्यास यशस्वी ठरले. गंभीर बाब म्हणजे विचुंबे गाढी नदी पूल, पोदी स्मशानभूमी, विसपुते कॉलेज, सेक्टर १५, पंचशील नगर, श्रीयश हॉस्पिटल ते नवीन पनवेल ब्रिजपर्यंत तब्बल तीन किलोमीटर हाय टेन्शन वायर लोंबकळत असल्याचे समोर आले. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.घटना पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील पार्किंग आणि रिक्षा स्टँड परिसरात घडली. यात पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेल्या दुचाकींचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे . बिकानेर स्वीट्स समोरील हाय टेन्शन टॉवरवरून वायर तुटली आणि झोपड्यांवर कोसळताच आग लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे धुराचे प्रचंड झोत वरपर्यंत उठल्याने स्टेशन परिसरातील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ही दुर्घटना शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या महत्त्वाच्या वेळेत घडल्याने शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेबद्दल पालकांमध्ये भीती निर्माण झाली.रिक्षा वाहतूक व स्कूल बस काही काळ विस्कळीत झाल्या तर स्टेशन परिसरातही प्रवाशांची गर्दी वाढली आणि वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती अॅड. मनोज भुजबळ, पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि टीआयपीएलचे जगदीश घरत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांची विचारपूस करत प्रशासनाला मदतकार्य गतीमान करण्याचे निर्देश दिले. 
फोटो - पंचशील नगर झोपडपट्टीत आग
Comments