साईबाबांच्या मानाच्या उरणच्या पालखीला महेंद्रशेठ घरत यांचा खांदा...
महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे साईभक्तांना टी-शर्ट ...
उलवे, ता. २५ : "उरण येथील श्री साई सेवा मंडळाच्या मानाच्या पालखीची यथोचित पूजा मंगळवारी महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते दत्त मंदिरात करण्यात आली. यावेळी आरतीचा मानही साई भक्तांनी महेंद्रशेठ घरत यांना दिला. त्यानंतर श्री साई सेवा मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मी गेली ३८ वर्षे शिर्डीला न चुकता जातोय. १९८७ मध्ये मी न्हावायार्डला कामाला लागताच पहिल्यांदा एसटीने शिर्डीला गेलो होतो. तेव्हापासून साईबाबांचा आशीर्वाद मला मिळतोय. त्यामुळे सर्वच दिंड्यांना अनेक वर्षांपासून मी सढळ हस्ते मदत करतोय. साईबाबांचा आशीर्वाद माझ्या मागे कायम आहे. मी साईभक्त असल्यामुळेच माझ्या शेलघरमध्ये भव्यदिव्य साई मंदिर बांधतोय. ते काम लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी मी जिवाचा आटापिटा करतोय. साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. माझी वाटचाल त्याच मार्गाने सुरू आहे. उरणमधून २५ वर्षांपूर्वी सुरू झालेली पालखीची परंपरा अखंड चालत राहावी, म्हणून मी दरवर्षी पालखीला येतो आणि मदतही करतो. कडक उन्हाळ्यात साईभक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून साईबाबांकडे उरणच्या साईभक्तांसाठी सुखरूप प्रवासासाठी प्रार्थना करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो. साईभक्तांनी मला आरती आणि पूजेचा मान दिल्याने मी धन्य झालो आहे."
मंगळवारी उरणमधून हजारो साईभक्त साईबाबांची पालखी घेऊन सकाळी साडेनऊच्या सुमारास पायी दिंडीने शिर्डीला निघाले. तेव्हा साईंच्या पालखीला महेंद्रशेठ यांनी खांदा दिला. यावेळी उरणच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर उपस्थित होत्या.
साईबाबांची पालखी श्री साई सेवा मंडळ उरण काढते. त्यांचे यंदा पालखीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, ही गौरवास्पद बाब आहे. त्यांचा आदर्श घेऊन उरण परिसरात शिर्डीला पायी दिंडीने निघण्याची परंपरा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांचा हा आदर्शवत प्रवास आहे, असेही आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी साईबाबांच्या पालखी प्रस्थानावेळी आपले मत व्यक्त केले.
यावेळी साईंच्या चरणी पायी दिंडीद्वारे शिर्डीला जाणाऱ्या तरुणांना महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे टी-शर्ट देण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून टी-शर्ट देण्याचा उपक्रम महेंद्रशेठ घरत यांनी सुरू ठेवला आहे. यावेळी एम. जी. ग्रुपचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री साई सेवा मंडळाचे अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे, सेक्रेटरी जगदीश कडू, खजिनदार अमित कडू आणि मंडळाचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साईनामाच्या गजरात उरणहून पालखी निघाली असून ३ डिसेंबरला शिर्डीला पोहोचेल.