डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमीत्त आयोजित पथनाट्य स्पर्धेत आर्ट हब मुंबई ठरले "विवेक जागर करंडक" विजेते...
पनवेल / प्रतिनिधी : -
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमीत्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखेतर्फे आयोजित "विवेक जागर करंडक" पथनाट्य स्पर्धेत अप नेक्स्ट ग्रुप इन असोसिएशन विथ आर्ट हब, मुंबई प्रथम क्रमांकाने विजेते ठरले तर परिवर्तन नाट्य कला संस्था खोपोली यांनी द्वितीय क्रमांक व महर्षी दयानंद कॉलेज परळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद व अभिनेत्री आकांक्षा गाडे या उपस्थित होत्या. सर्वोत्कृष्ठ अभिनेता प्रांजल तावडे (रत्नम कॉलेज, भांडुप), सर्वोत्कृष्ठ लेखक कांचन गुरव व वैष्णवी जाधव(नाट्यरुची कलामंच, चेंबूर), सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शन संदेश लाळगे (निर्मला निकेतन, फोर्ट) यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट २०१३ रोजी करण्यात आली. त्यांचे विवेकी विचार संपवण्याचा तो प्रयत्न होता. त्याचा निषेध करतानाच समितीने ' हिंसा के खिलाफ मानवता की ओर' हे अभियान सुरू केले. तरुणाईत विवेकी विचारांचा जागर व्हावा म्हणून पनवेल शाखा गेली सात वर्षे ही पथनाट्य स्पर्धा भरवत आहे. यावर्षी स्पर्धेचा विषय 'युद्ध म्हणजे....' हा होता. स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळ राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर, राज्य सरचिटणीस आरती नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गायकवाड, शाखा अध्यक्ष बाबासाहेब चिमणे हे उपस्थित होते.
स्पर्धेत अंतिम फेरीत सादरीकरणासाठी १९ संघ होते. सर्वांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले. विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, पुस्तक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कृतार्थ शेवगावकर, समीर ताभाने, अपूर्वा कदम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धा १७ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पनवेल येथे पार पडली.