भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा राज्य उपाध्यक्ष सय्यद अकबर यांचा अभिनव उपक्रम
पनवेल / प्रतिनिधी
गरिबांचे कैवारी, दानशूर, राजकीय परिस्थितीचे सखोल विचार कर्ते,रायगड कोकण चे भाग्यविधाते, कलाकार आणि साहित्यिकांचे आश्रयदाते, संस्कृती रक्षक, अनेक शैक्षणिक संस्थांची निर्मिती करून भावी पिढीला एज्युकेशनल प्लॅटफॉर्म मिळवून देणारे,औदार्याचे बाबतीत आधुनिक महाराष्ट्राचे कर्ण, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने गरीब गरजू विद्यार्थिनीला अभियांत्रिकी शिक्षणासाठी भरघोस आर्थिक सहाय्य करण्याचा अभिनव उपक्रम भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष सय्यद अकबर यांनी राबविला आहे. अनोख्या पद्धतीने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचे अभिष्टचिंतन केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तत्पूर्वी सोमवार दिनांक २ जून रोजी सय्यद अकबर यांनी रामशेठ ठाकूर यांना फेटा बांधून, मायेची शाल पांघरून पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिष्टचिंतन केले. तसेच त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर सय्यद अकबर यांनी पनवेल येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या पीर करम अली शाह दर्ग्यावर जाऊन रामशेठ ठाकूर साहेबांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठी चादर चढवून प्रार्थना केली.
विंदा करंदीकर यांची देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे! या अजरामर काव्यातील शेवटच्या पंक्ती मध्ये ते म्हणतात की... घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ! म्हणजेच एखाद्या दानशूर व्यक्ती कडून दान देण्याची शिकवण घ्यावी..अगदी याच उक्ती प्रमाणे सय्यद अकबर यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ठायी असणाऱ्या दानशूर या गुणाचे अनुकरण करण्याचे योजले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की रामशेठ ठाकूर साहेब हे माझ्यासकट अनेक कार्यकर्ते मंडळींचे दैवत आहेत. ते एकमेवाद्वितीय आहेत त्यांच्यासारखं कुणीही होणार नाही. त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेलेला कुणीही खाली हात परत जात नाही. आज अनेक शैक्षणिक संस्था त्यांच्या मुळे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. अनेक धार्मिक स्थळांचे नूतनीकरण, पुनरुज्जीवीकरण हे त्यांच्यामुळेच शक्य होत आहे. पनवेल उरण तालुक्यातील होतकरू तरुणांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळता यावे यासाठी त्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दिमाखात उभे आहे. त्यांच्यासारख्या धोरणी आणि अभ्यासू नेतृत्वामुळेच प्रकल्पग्रस्त बांधव ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत आहेत.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि म्हणूनच आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजासाठी दान केला पाहिजे ही शिकवण त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली आहे.
म्हणूनच त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने काळसेकर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या अलिशा शेख या गरीब व गरजू विद्यार्थिनीला मी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीला मदत करून लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे अभिष्टचिंतन करण्याचा प्रयत्न मी या वर्षी केला आहे.तसेच रामशेठ ठाकूर साहेबांच्या प्रत्येक जन्मदिनी मी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन देतो.यावेळी सय्यद अकबर यांच्या समवेत उद्योजक सुधीर सुर्वे व पत्रकार साबीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.