शेकापक्ष आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ...
पनवेल दि.२३(वार्ताहर): शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पनवेलमधील व्ही. के. हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 147 रक्तदात्यांनी रक्तदान करुन समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडले. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, गोपाळ भगत, प्रमोद भगत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवा पाटील, शेकाप रायगड जिल्हा महिला सहचिटणीस तेजस्विनी घरत, नगरसेविका प्रज्योती प्रकाश पाटील, माधुरी गोसावी, दीक्षा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळाराम पाटील म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, त्याची आज समाजाला गरज आहे. कारण, रक्तदानामुळे आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. सध्या आपल्याकडे रक्ताचा तुटवडा भासत असून, त्यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने प्रयत्न करत आहोत. यावेळी काशिनाथ पाटील यांनी सांगितले, शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतो. दोनच दिवसांपूर्वी आम्ही विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता आणि आज हे रक्तदान शिबीर आयोजित करून समाजाप्रती शेकापची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांनी सांगितले, शेतकरी कामगार पक्ष एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर चालणारा पक्ष आहे. माजी आमदार विवेकानंद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही हे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरासाठी पनवेल ग्रामीण भागातील कार्यकर्ते, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी रक्तदान करुन कर्तव्य पार पाडले. यावेळी तेरणा मेडिकल ट्रस्टच्यावतीने हे सर्व रक्त गोळा करण्यात आले. हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यासाठी शेकाप पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, पनवेल महानगरपालिका चिटणीस प्रकाश म्हात्रे, बबन विश्वकर्मा, बंटी पाटील आदींनी मेहनत घेतली.
फोटो: रक्तदान शिबीर