पनवेलकरांना लवकरच मिळणार हक्काचे पाणी
पाणीपुरवठा योजनेची क्षमता वाढून होणार २२८ एमएलडी
पनवेल /(प्रतिनिधी) महापालिका क्षेत्रात १०० एमएलडी पाणी पुरविणारी न्हावा शेवा पाणीपुरवठा योजनेची क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढून २२८ एमएलडी होणार आहे. त्यामुळे पनवेलकरांना हक्काचे पाणी मिळणार असून पुढील २० वर्षांचे सुरळीत पाणी पुरवठा नियोजन होणार आहे.
पनवेलकरांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पनवेल परिसरात झपाटयाने नागरीकरण होत आहे आणि त्यामुळे अर्थातच विविध सेवांवर त्याचा ताण येणारच. अशातच आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढील २० वर्षांचे पाणी नियोजन करताना त्याप्रमाणे कार्यवाहीची मागणी केली. ते फक्त मागणी करून थांबले नाहीत तर त्याचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या सर्वांचा फलित म्हणून या प्रकल्पातील सर्व कामे पूर्ण होऊन येत्या वर्षापासून नियमित मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरणारी न्हावाशेवा पाणीपुरवठा योजनेचे काम पाईपलाईनच्या जागेतील अतिक्रमणांमुळे रखडले. याचा परिणाम योजनेच्या २२ कोटींच्या यांत्रिकी कामावर देखील झाला. ते पूर्ण झाल्याशिवाय यांत्रिकी कामे करता येणे शक्य नसल्यामुळे ही कामेदेखील वाढीव मुदतीत होणार आहेत. ३६४ कोटींची बांधकामाशी संबंधित कामे रखडल्यामुळे अवघ्या २२ कोटींच्या कामावरही याचा परिणाम झाला आहे. वयाळ आणि भोकरपाडा येथे पंपिंग मशीन, हेडवर्क्स, सबस्टेशन आदी महत्त्वाच्या कामांसह शुद्ध आणि अशुद्ध पाण्यासाठी पंपिंग मशीन, स्काडा व ऑटोमेशन यंत्रणा, एक्सप्रेस फीडर, जलशुद्धीकरण केंद्रातील यांत्रिकी कामांना विलंब झाला असला तरी या तांत्रिक बाबी दूर होऊन कामे पूर्णात्वास नेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न मंत्रालय स्तरावर प्रयत्न केला आहे. त्यामुळे लवकरच हि योजना पूर्ण होऊन पुढील अनेक वर्षे पनवेलकरांना पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.