पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची विशेष बैठक संपन्न ...
पनवेल / प्रतिनिधी
पत्रकार उत्कर्षासाठी झटणारी आणि सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असणारी पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणजे पनवेल पत्रकार विकास मंच. सोमवार दिनांक १० जून रोजी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची विशेष बैठक संपन्न झाली. अध्यक्ष विवेक मोरेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष बैठकीच्या सुरुवातीला पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पनवेलच्या जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे साप्ताहिक श्रीविद्या चे संस्थापक संपादक केशव विनायक केळकर आणि त्यांचे चिरंजीव शशिधर केळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना मंचाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे सन्माननीय सदस्य तथा सल्लागार अविनाश कोळी यांना सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात आमंत्रण प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव पारित करण्यात आला.
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सन्माननीय सदस्या तृप्ती पालकर यांची एन डी टी वी या वृत्तवाहिनीवर अँकर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यानंतर अध्यक्ष विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर सल्लागार माधव पाटील आणि डॉक्टर संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे कामकाज संपन्न झाले. यामध्ये मंचामध्ये समाविष्ट होण्यासाठी आलेल्या अर्जांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. आगामी काळातील सामाजिक उपक्रमांचे नियोजन व त्याचे कॅलेंडर बनवण्यात आले.
लवकरच पनवेल तालुका पत्रकार विकास मंच हा "पश्चिम किनारपट्टीवरील नागरिकांची मान्सून पूर्व तयारी" या विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्टडी टूर आयोजित करणार असल्याचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर बैठकीची सांगता झाली. या बैठकीला अध्यक्ष विवेक मोरेश्वर पाटील, सल्लागार जेष्ठ पत्रकार माधव पाटील, सल्लागार डॉ. संजय सोनवणे, उपाध्यक्ष संजय कदम, माजी सरचिटणीस मंदार दोंदे, प्रवीण मोहोकर, भरत कुमार कांबळे,राजू गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.