३१पैकी ४ आरोपी पनवेल पोलिसांच्या जाळ्यात
पनवेल / प्रतिनिधी : -
बॉलीवुड मधील प्रसिद्ध सिनेअभिनेते सलमान खान यांना जिवे ठार मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिष्णोई व गोल्डी ब्रार गॅन्ग मधील साथीदार हे पनवेल व कळंबोली परिसरात रहात असून ते सलमान खान यांचे पनवेल येथील फार्म हाऊस, बांद्रा, मुंबई येथील त्यांचे राहते घर तसेच ते शुटींग करीत असलेल्या ठिकाणी पाळत ठेवून त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर त्यांनी रेकी केली असल्याच्या माहितीनंतर पोलिसांची चक्रे फिरली. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या जलद तपासानंतर यातील 31 पैकी 4 आरोपीना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, नवी मुंबई पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे, परिमंडळ २, पनवेल, सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपुत यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याच्या अनुषंगाने सुचना दिल्यानंतर पनवेल शहर पोलीसांनी वेगवेगळी पथके तयार केली. पथकाने केलेल्या चौकशीमध्ये व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या मोबाईल क्रमांकाच्या माहितीवरुन अजय कश्यप उर्फ धनंजय तपेसिंग (वय २८ वर्षे), गौरव भाटीया उर्फ संदीप बिष्णोई (वय २९ वर्षे), वसीम चिकना (वय ३६ वर्षे) व इतर आरोपीची नावे निष्पन्न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तांत्रीक माहितीचे विश्लेषण करून त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याची पथके बेंगळूरू, छत्रपती संभाजीनगर, गुजरात, दिल्ली इ. विविध ठिकाणी पाठविण्यात आली. त्यामध्ये आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, संपत नेहरा व गोल्डी ब्रार तसेच सुखा शुटर यांनी सिने अभिनेते सलमान खान यांना ठार मारण्याच्या उद्देशाने वेळोवेळी प्रोत्साहीत केल्याचे दिसून आले. तसेच त्यांनी गोरेगांव, बांद्रा व पनवेल येथे सलमान खान याचे वास्तव्य असलेल्या परिसराची रेकी केल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाल्यानंतर धनंजय तपेसिंग उर्फ अजय कश्यप (वय २८ वर्षे) यास पनवेल येथून ताब्यात घेतले तर गौरव भाटीया उर्फ न्हायी उर्फ संदिप विष्णोई, (वय २९ वर्षे) यास गुजरात येथून आणि वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना (वय ३६ वर्षे) यास छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. याचबरोबर झिशान झकरुल हसन उर्फ जावेद खान (वय २५ वर्षे) यास बेंगलोर कर्नाटक येथून ट्रान्झीस्ट रिमांड घेवून अटक करण्यात आली असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी आरोपीकडून पोलिसांनी दोन मोबाईल फोन हस्तगत करून अधिक तपास सुरु केला असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
या घटनेचा तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वापोनि नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (प्रशा) प्रवीण भगत, सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, बजरंग राजपूत, पोलीस उप निरीक्षक विनोद लभडे, अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार अविनाश गंथडे, यशवंत झाजम, नितीन वाघमारे, महेंद्र वायकर, परेश म्हात्रे, अमोल पाटील, पोलीस नाईक संजय सावंत, विनोद देशमुख, रविंद्र पारधी, पोशि/प्रसाद घरत, किरण कराड, साईनाथ मोकल, अभय मेऱ्या, विशाल दुधे, तसेच तांत्रीक तपास सपोनि महेश माने, पोलीस हवालदार वैभव शिंदे, पोशि प्रवीण पाटील यांच्या पथकामार्फत सुरु आहे.