मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल वैभव / दि. १० ( संजय कदम ) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयांतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन आज रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले , यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की , महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयांतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आले आहे .तसेच या वेळी एनआरआय पोलीस ठाणे व तळोजा पोलीस ठाणे येथील पुरावा व्यवस्थापन कक्षाचेदेखील ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन झाल्याचे त्यांनी सांगितले .
या कार्यक्रमास आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर ,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी किसन जावळे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे,मा . खा. संजीव नाईक ,माजी सभागृह नेते परेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते .
मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांकडून या कक्षाचे कामकाज, केस पेपर रूम, रेकॉर्ड कक्षाची पाहणी तसेच ई-पैरवी कक्षाचे कामकाज, सायबर सेलच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली .कार्यक्रमस्थळी विविध प्रकल्पांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये डायल ११२, आय बाईक,यथार्थ, नेल्सन सिस्टीम, जागरूक नवी मंबईकर, सायबर /एफआययु, वुमन हेल्प डेस्क, ट्राफीक हेल्प डेस्क स्टॉल्सचा समावेश होता . गुन्ह्यातील मुद्देमाल हा पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षामध्ये ठेवला जात असतो, परंतु पोलीस ठाण्यात पुरेशी जागा नसणे, मुद्देमाल खराब होणे, ओला होणे या सारख्या अनेक समस्यांमुळे मुद्देमाल योग्य पद्धतीने न्यायालयासमक्ष सादर करण्यात अडचणी निर्माण होत असत. हा सर्व मुद्देमाल पोलीस ठाण्यातून स्वतंत्र ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठेवल्यास जागेची, वेळेची व मनुष्यबळाची बचत होऊ शकते या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाची संकल्पना राबविण्यात आली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले . तसेच आगामी काळात अमली पदार्था विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले . तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सांगितले की , परिमंडळ स्तरावर परिमंडळ १ (वाशी) कडील पोलीस ठाण्यांकरिता एनआरआय पोलीस ठाण्याच्या आवारात व परिमंडळ २ (पनवेल) कडील पोलीस ठाण्यांकरिता पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षामध्ये ईव्हीडन्स मॅनेजमेंट सिस्टीम या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे.प्रत्येक पोलीस ठाण्याकरिता स्वतंत्र रँक व मुद्देमालासाठी स्वतंत्र क्युआरकोड असल्याने मुद्देमाल तत्काळ एका क्लिकवर उपलब्ध होणार असून मुद्देमालाची ताबा साखळी राखली जाणार आहे. यासह तळोजा पोलीस ठाणे आवारात मध्यवर्ती मुद्देमाल व्यवस्थापन वाहने कक्ष येथे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांकडून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली वाहने ठेवण्यात येणार आहेत.त्यामुळे पोलीस खाते आता आधुनिकीकरणांकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले . तर प्रास्ताविक करताना नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की ,पोलीस खात्यातील कामाचा वाढता ताण व अपुरे मनुष्यबळ यातून मार्ग काढत नवनवीन संकल्पना राबवून परिमंडळ एक व दोन या स्तरावर अश्या प्रकारचे उपक्रम सुरु करण्यात आले असून यामुळे पोलिसाना मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले . या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला .
फोटो - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले उदघाटन