चाकू दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस तळोजा पोलिसांनी केले गजाआड..
आरोपीस तळोजा पोलिसांनी केले गजाआड..


पनवेल दि.२२(वार्ताहर): तळोजा एमआयडीसीत माल भरण्यासाठी टेम्पो घेऊन आलेल्या चालकाला चाकूचा धाक दाखवत टेम्पो घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला लुटारू टेम्पोचालकाच्या प्रसंगावधानामुळे पोलिसांच्या हाती लागला. सूरज कांबळे असे आरोपीचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
            तक्रारदार टेम्पोचालक महेंद्र पटेल (२७) नालासोपारा भागात राहण्यास असून सकाळच्या सुमारास तो दीपक फर्टिलायझर कंपनीत माल भरण्यासाठी जात होता. मुंब्रा-पनवेल मार्गावरील आरएएफ सिग्नलजवळ लघुशंका
करण्यासाठी रस्त्यालगत टेम्पो उभा केला. सूरजने लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून त्या ठिकाणी लघवी केल्याने दोन हजार रुपये दंड द्यावा लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर महेंद्रच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.
सूरजने टेम्पोचा ताबा घेऊन केबिनची झडती घेतली. पैसे नसल्याने महेंद्रला मालकाकडून गुगल पेवर ५ हजार रुपये मागवून घेण्यास बजावले. त्यानंतर टेम्पो तळोजा फेज-२ कडे नेण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहतूक कोंडी असल्याचे लक्षात आल्यानंतर महेंद्रने आरडाओरड केली. काही लोक मदतीस आले आणि त्याला तळोजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Comments