पोलिसांनी दाखवले माणुसकीचे दर्शन : खत्री कुटुंबियांसाठी ठरले देवदूत....
पोलिसांनी दाखवले माणुसकीचे दर्शन : खत्री कुटुंबियांसाठी ठरले देवदूत....


पनवेल दि.०१(संजय कदम) : एका गरीब घरातील कुटुंबियांसाठी पनवेल शहर पोलीस देवदूत ठरले असून मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी माणुसकी दाखवत केलेल्या मदतीमुळे आज एका महिलेचे बाळांतपण सुखरूपपणे झाले व तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
पनवेल जवळील करंजाडे आर ३ या ठिकाणी वॉचमनचे काम करणारा नवराज खत्री हा मध्यरात्री २.३० ते ३.०० च्या सुमारास हा त्याच्या घराजवळील रस्त्यावर हातात दांडका घेऊन उभा होता. दरम्यान, त्यावेळी या परिसरातून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक महेश पाटील, पोलीस नाईक अशोक राठोड, पोलीस नाईक मिथुन भोसले व पोलीस शिपाई विशाल दुधे हे गस्त घालत असताना त्यांना नवराज खत्री हा हातात दांडका घेऊन दिसला. या पथकाने त्याच्याकडे जाऊन विचारपूस केली असता, त्याने सदर दांडका हा कुत्रे पळवण्यासाठी हातात घेतला असून मी रिक्षाची वाट बघत असल्याचे सांगितले. या वेळी पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की माझी पत्नी बाळांतीण असून तीला प्रसूतीकळा सुरु झाल्या आहेत. तीला त्वरित पनवेल उपजिल्हा रुग्णालयात हलवणे गरजेचे आहे. या वेळी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या जवळील खाजगी गाडीत पतीसह पत्नीला घेऊन तिला वेळेत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणले. यावेळी डॉक्टरांनीही तातडीने पुढील उपचार सुरु करून पशुपती नवराज खत्री (वय २५) हिचे सुखरूप बाळंतपण केले. तिने ३ किलो वजनाच्या गोंडस मुलाला जन्म दिला. मध्यरात्रीच्या सुमारास कोणत्याही मदतीचा संधी उपलब्ध नसताना पोलीस देवदूता सारखे धावून आल्याने माझ्या पत्नीचे बाळंपण सुखरुपणे पार पडल्याने खत्री कुटुंबीयांनी पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले आहेत.
फोटो : खत्री कुटुंबीय मुलासह
Comments