पनवेल अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव पालकर तर उपाध्यक्षपदी जनार्दन पाटील..

सन २०२२ ते २०२७ कार्यकाळासाठी संचालक मंडळाची स्थापना

पनवेल: प्रतिनिधी
          दि.पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव पालकर तर उपाध्यक्षपदी जनार्दन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल अर्बन बँकेत आज (सोमवार दि.२६ डिसेंबर) निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे यांच्या देखरेखीखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. अर्बन बँकेच्या तेरा पैकी तेरा जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला असल्याने महाविकास आघाडीतील नेतेमंडळींच्या सहमताने अध्यक्षपदी शेकापचे बाबुराव पालकर तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे जनार्दन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
         पनवेल अर्बन बँकेच्या सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कार्यकाळात अध्यक्षपदी शेकापचे बाबुराव पालकर, उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे जनार्दन पाटील यांच्यासह संचालक शेकापचे दिलीप कदम, अनिल केणी, राजेश खानावकर, हितेन शहा, बी पी म्हात्रे, पांडुरंग भागिवंत, काँग्रेसचे अरविंद सावळेकर, विमल गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण तर शिवसेनेचे ज्ञानेश्वर बडे व प्रवीण जाधव हे कामकाज पाहणार आहेत.
         याप्रसंगी पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, काशिनाथ पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, नारायणशेठ घरत, काँग्रेसचे जेष्ठ नेते जी आर पाटील, अनंत डी पाटील, मल्लिनाथ गायकवाड, गणेश कडू, हेमराज म्हात्रे, निलेश म्हात्रे, प्रताप गावंड, अरुण ठाकूर यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळ, महाविकास आघाडीतील नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         गेल्या ३० वर्षांपासून पनवेल अर्बन बँकेवर शेकापची सत्ता राहिली आहे. पनवेल अर्बन बँकेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. एकूण १३ जागांसाठी २७ उमेदवार पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. यामधील तेरा पैकी तेराही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त केला. 

कोट:
पनवेल-उरण महाविकास आघाडीने प्रथमच एकत्ररित्या निवडणुक लढवली आणि घवघवीत यश संपादन केले. पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने भाजपचा दारूण पराभव केला. या बँकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या माध्यमातून उत्तमोत्तम सेवा देण्याचा मानस असेल. तसेच त्या दृष्टिकोनातून नियोजनही देखील केले जाईल. 
- बबनदादा पाटील, अध्यक्ष- पनवेल उरण महाविकास आघाडी

कोट:
महाविकास आघाडी एकसंघ असून यापुढेही अशाचप्रकारे एकसंघ राहून निवडणुकांना सामोरे जाऊ व जिंकू सुद्धा असा विश्वास आहे. सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
- सुदाम पाटील, सचिव- पनवेल उरण महाविकास आघाडी

कोट:
पनवेल अर्बन बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबुराव पालकर व उपाध्यक्ष जनार्दन पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ज्याप्रमाणे पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत भाजपचा धोबीपछाड करून सर्व तेरा जागांवर विजय मिळवला, त्याच पद्धतीने आगामी पनवेल महापालिकेसह पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीला यश मिळेल यात तिळमात्रही शंका नाही.
- अभिजित पाटील, पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष

कोट:
सातत्याने गेली अनेक वर्षे पनवेल अर्बन बँकेवर शेकापचा वरचष्मा राहिलेला आहे. सोबतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्हीही पक्ष असून शिवसेनेच्या रूपाने आणखीन एक मित्र अर्बन बँकेला मिळाला. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील १३-० याप्रमाणे भाजपचा पराभव केला. महाविकास आघाडीच्या वतीने बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन व शुभेच्छा.
- जे एम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष

कोट:
पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या विजयातून महाविकास आघाडीची एकजूट सर्वांनी अनुभवली. महाविकास आघाडीत फूट पडली अशी वल्गना करणाऱ्या विरोधकांना या बँकेच्या निवडणुकित मिळालेल्या विजयातून एक प्रकारे ही एक चपराक आहे. आज बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह संचालक मंडळाची स्थापना झाली असून पुढील काळात सर्व ग्राहकांना सर्व प्रकारच्या उत्तम सेवा देण्यासाठी महाविकास आघाडीचे संचालक मंडळ कटिबद्ध असेल. सर्व संचालकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
- शिरीष घरत, जिल्हाप्रमुख- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Comments