रामदास शेवाळे यांनी साजरा केला अनोखा शिक्षक दिन
पनवेल / प्रतिनिधी:- शारीरिक व्याधीवर मात करत मुलांना घडवणाऱ्या दिव्यांग शिक्षकांचा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी सन्मान केला. या माध्यमातून त्यांनी अनोखा शिक्षक दिन साजरा करत समाजासमोर एक वेगळा वस्तुपाठ ठेवला.
जिल्हा परिषद आणि अनुदानित मराठी शाळांमध्ये शिक्षक दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना देतात. गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करत संस्कारक्षम पिढी घडवतात. शारीरिक दृष्ट्या सक्षम असलेल्या शिक्षकांनाही सहज शक्य आहे. परंतु अपंगत्व आलेल्या शिक्षकांना शारीरिक व्यंगावर मात करत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागते. असे शिक्षक पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर अनुदानित शाळांमध्ये ही ज्ञानदानाचे काम ते करतात. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करण्याची धमक असणाऱ्या या ज्ञानवंत शिक्षकांचा सन्मान करण्याचे शिवसेनेचे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी योजले आणि शिक्षक दिनानिमित्त हा सुवर्णयोग त्यांनी साधला. देवीचा पाडा येथील मुख्याध्यापक मच्छिंद्र मोहिरे, ज्ञानरचनावाद, स्मार्ट डिजिटल शिक्षण त्याचबरोबर नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करणारे संजय वसंत खटके,
सरिता सोनार,दत्तात्रय भोंडकर,संतोष पाटील
अंकुश जाधव, नारायण सावंत यांचा शिक्षक दिनानिमित्त यथोचित सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे बिमा संकुल चा राजा समोर हा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, कळंबोल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, माजी नगरसेविका विद्या गायकवाड, बांधकाम व्यवसायिक राहुल हजारे, वाहतूकदार दादा तरंगे, एस एस पाटील, मंडळाचे खजिनदार शरद कदम, महेश गोडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोट
आई वडीला नंतर आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकांचे स्थान मोलाचे असते. ते संस्कारक्षम पिढी घडवतात. देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा हा सिंहाचा असतो. समाज घडवणार्या शिक्षकांचे कार्य खरोखर आदर्शवत असते. त्यातली त्यात शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असणाऱ्या शिक्षकांचे काम हे उल्लेखनीय आहे. अशा शिक्षकांचा सन्मान आम्हाला करता आला याचा सार्थ अभिमान आहे
रामदास शेवाळे
जिल्हा संपर्कप्रमुख
शिवसेना