दोघा प्रवाशांनी रिक्षा चालकास लुटले ...
दोघा प्रवाशांनी रिक्षा चालकास लुटले ... 

पनवेल दि २०, (वार्ताहर): रिक्षामध्ये बसलेल्या दोघा लुटारुंनी रिक्षा चालकाला कोल्ड्रींक्स मधून गुंगीकारक द्रव्य पाजून त्यांना बेशुध्द करीत त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा सुमारे पाऊण लाख रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे. गुंगीकारक द्रव्यामुळे बेशुध्दावस्थेत गेलेले रिक्षा चालक मारुती कृष्णा म्हात्रे (४५) ३ दिवसानंतर शुध्दीवर आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.कळंबोली पोलिसांनी या घटनेतील २ लुटारूंविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 
                   
मारुती कृष्णा म्हात्रे पनवेल मधील करंजाडे भागात राहतात. म्हात्रे उरण नाका येथील रिक्षा स्टँडवर रिक्षा घेऊन उभे होते. यावेळी दोन व्यक्ती पनवेल बस स्टँड येथे जाण्याच्या बहाण्याने त्यांच्या रिक्षात बसल्या. रिक्षा पनवेल बस स्टँडवर पोहोचल्यानंतर दोघा व्यक्तींनी म्हात्रे यांना कळंबोली एमजीएम हॉस्पीटल येथे जाण्याचा बहाणा करुन त्यांना कळंबोलीतील वरुण बार जवळ नेले. त्यानंतर एक व्यक्ती ५० हजार रुपये घेऊन येणार असल्याचे सांगून म्हात्रे यांना तेथे थांबवून ठेवले. यादरम्यान दुसऱ्या व्यक्तीने कोल्ड्रींक्सच्या तीन बाटल्या आणून त्यापैकी एक बाटली रिक्षा चालक म्हात्रे यांना दिली. म्हात्रे यांनी कोल्डींक प्यायल्यानंतर दोघा व्यक्तींनी त्यांना रोडपालीमध्ये नेले. यादरम्यान, म्हात्रे यांना गुंगी आल्याने ते रिक्षामध्ये बेशुध्द पडले. याचाच फायदा उचलत दोघा लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील पाऊण लाखाची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन तसेच १५०० रुपयांची रोख रक्कम लुटली. त्यानंतर त्यांनी म्हात्रे यांना त्याच अवस्थेत रिक्षामध्ये सोडून पलायन केले. म्हात्रे  त्याच ठिकाणी रिक्षामध्ये बेशुध्दावस्थेत पडल्याचे सदर भागातील हॉटेल मधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी म्हात्रे यांच्याजवळ असलेल्या मोबाईल वरुन त्यांच्या कुटुंबियांना संपर्क साधला. त्यांनंतर त्यांच्या कुटुंबियांनी कळंबोलीत धाव घेऊन बेशुध्दावस्थेत असलेल्या म्हात्रे यांना पनवेल मधील गांधी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर म्हात्रे शुध्दीवर आले. त्यानंतर त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Comments