तळोजामधील महिलेला ऑनलाईन कर्ज पडले महागात ...
तळोजामधील महिलेला ऑनलाईन कर्ज पडले महागात 


पनवेल दि.२५ (वार्ताहर) : तळोजा परिसरात ऑनलाईन कर्ज एका महिलेला महागात पडले आहे. या कर्जाची परतफेड करूनही पैसे उकळण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडून फोटो मॉर्फ करून या महिलेला मानसिक त्रास देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तळोजा परिसरात रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने कमी व्याज दर आणि तत्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने एका अॅपवर फोटो, दस्तावेज आणि नातेवाईकांचे संपर्क क्रमांक देऊन तीन हजार सहाशे रुपयांचे कर्ज घेतले होते. सात दिवसांसाठी घेतलेल्या या कर्जाची ऑनलाईन परतफेडदेखील केली होती. तरी एका अनोळखी व्यक्तीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली नसल्याचे सांगत वारंवार संपर्क केला जात होता. यावेळी पीडित महिलेने घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याचे सांगून सर्व मोबाईल ब्लॉक केले; पण पुन्हा आठ दिवसांनी कर्जासाठी दिलेले फोटो मॉर्फ करून नातेवाईकांना पाठविण्यात आले. या प्रकाराने पीडित महिलेला मानसिक धक्का बसला असून या प्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
Comments