रेल्वे प्रशासनाकडून विभाजन प्रक्रियेदरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीस अभिवादन..

प्रदर्शनाच्या माध्यमातून जागविल्या विभाजनाच्या कटू स्मृती

प्रतिनिधी/ पनवेल
     देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला उद्या 75 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असताना त्याच्या आदल्या दिवशी सुरू झालेल्या विभाजन प्रक्रियेच्या कटू स्मृती देखील आजही कोरल्या गेल्या आहेत. देशाच्या विभाजनाच्या प्रक्रियेत मृत्युमुखी पडलेल्या लाखो नागरिकांच्या स्मृतीस अभिवादन करण्याचा अत्यंत अभिनव उपक्रम सेंट्रल रेल्वेच्या मुंबई मंडलाने आयोजित केला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे आणि पनवेल या तीन रेल्वे स्थानकांवर अशाप्रकारे स्मृतिदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
       पनवेल रेल्वे स्थानकामध्ये पार पडलेल्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तसेच झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटी सदस्य अभिजीत पांडुरंग पाटील उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते,  पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्ती कुमार दवे यांची उपस्थिती लाभली. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्यसैनिकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.तसेच स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा सोहळा याची देही याची डोळा  अनुभवलेले यशवंत ठाकरे यांनी विभाजन प्रक्रियेचा इतिहास आणि पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवणी उपस्थितांच्या समोर विशद केल्या.
       या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय किसनराव एकनाथ जगनाडे यांना सन्मानित करण्यात आले त्यांचा सत्कार त्यांचे सुपुत्र नारायण जगनाडे यांनी स्विकारला. स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक गिरीराज किशोर अगरवाल यांचा सत्कार स्वीकारताना त्यांचे सुपुत्र नंदकुमार अगरवाल तर नातू गौतम अगरवाल उपस्थित होते. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय सदाशिव शांताराम ठाकूर यांचा सत्कार त्यांचे सुपुत्र यतिंदरनाथ ठाकूर यांनी स्वीकारला.
        ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करताना माजी नगराध्यक्ष अशोक खेर, वाय पी सिंग, प्रताप कांबळे, दत्ता ढोले यांचे सत्कार केले.तर स्थानक सल्लागार समितीचे सदस्य यशवंत ठाकरे, श्रीकांत बापट, मंदार दोंदे, रमेश जानोरकर, डॉक्टर मधुकर आपटे यांचे सत्कार संपन्न झाले.अत्यंत अभिनव आणि नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने वेल्फेअर इन्स्पेक्टर भास्कर देवाडिगा, पनवेल सी सी आय आनंद प्रकाश मीना, स्टेशन प्रबंधक विजू जॉन, स्टेशन मास्टर कमर्शियल सुधीर कुमार, पनवेल सी बी एस हेमंत गुप्ता, एस एस ई टेलिकॉम आनंद कुमार, पनवेल सी बी एस डी.जयकांतन आदी मान्यवर उपस्थित होते.
     

चौकट
विभाजन प्रक्रिया आणि पहिला स्वातंत्र्य दिन अनुभवणारे यशवंत ठाकरे हे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेस पंधरा वर्षांचे होते. किंबहुना सदर कार्यक्रमात विभाजन पाहिलेला माणूस म्हणून ते एकमेव व्यक्तिमत्व होते. विभाजनाची प्रक्रिया दोन्ही देशांसाठी अत्यंत क्लिष्ट आणि संघर्षमय होती. परंतु या विभाजन प्रक्रियेतील रेल्वे प्रशासनाचे कार्य न भूतो न भविष्यती असे राहिले आहे. त्यावेळची निवडक छायाचित्रे प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना पाहता आली.
Comments