सिटी बेल आयोजित आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने संपन्न...


पालकमंत्री आदितीताई तटकरे यांचा असामान्य लोकसेवक पुरस्काराने सन्मान..
पनवेल/ प्रतिनिधी
      अल्पावधीतच वाचकांच्या मनावर रुंजी घालणाऱ्या सिटी बेल वृत्त समूहाच्या वतीने असामान्य व आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळ्याचे शुक्रवार दिनांक 3 जून रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांना या पुरस्कार सोहळ्यात असामान्य लोकसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत,पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर सी घरत, शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार तथा प्रवक्ते बबनदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर विराजमान होते. पनवेलच्या विरुपाक्ष हॉल येथे हा शानदार सोहळा संपन्न झाला.
        कोरोना विषाणू संक्रमण काळामध्ये पालकमंत्री म्हणून आदिती ताई तटकरे यांनी केलेल्या अप्रतिम कार्याबद्दल त्यांचा असामान्य लोकसेवक म्हणून सन्मान करण्यात आला. पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटल च्या डॉक्टर जयश्री प्रकाश पाटील यांच्या शुभहस्ते आदिती ताई तटकरे यांचा सन्मान करण्यात आला. टाळेबंदी च्या काळामध्ये अविरत कार्य करणाऱ्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या संस्थेला असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सचिव, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आसामान्य लोकसेवक पुरस्काराचा स्वीकार केला. तर जे एम म्हात्रे चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेला देण्यात आलेल्या असामान्य लोकसेवक पुरस्काराचा संस्थेचे अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. कामगार क्षेत्रामध्ये अफाट कार्यकर्तृत्व गाजविणारे व कामगार चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणारे कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांना या क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर स्वतः अल्पशिक्षित असून देखील शिक्षणक्षेत्रात तब्बल बारा शिक्षण संस्थांची निर्मिती करणारे शिवसेना सल्लागार तथा प्रवक्ते बबनदादा पाटील यांना असामान्य लोकसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले.सिटी बेल वृत्त समूहाचा प्रवास आणि पुरस्कर सोहळ्याचे प्रयोजन या बाबत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर पुरस्कार प्राप्त प्रभुतींचा अल्प परिचय करून देणारा सिटी बेल विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
       आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून सिटी बेल वृत्तसमूह करत असलेल्या घोडदौडीबद्दल समूह संपादक विवेक मोरेश्वर पाटील समूह संपादक मंदार दोंदे आणि टेक्नॉलॉजी डायरेक्टर वैभव सोनटक्के यांची प्रशंसा केली. आदिती ताई तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करते वेळी सिटी वृत्त समूहाने केलेल्या सन्मानाबद्दल त्यांचे आभार मानले. पुरस्कार प्राप्त प्रभुतींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.तर त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या डॉक्टर जयश्री पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केल्याबद्दल अत्यानंद झाला असल्याचे सांगितले. खासदार श्रीरंग बारणे यांनी सिटी बेल वृत्त समूहास आगामी काळात यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
     राष्ट्रपती पदक विजेत्या व दर्जेदार सिनेमा नाटक यांची निर्मिती करणाऱ्या रंगनिल संस्थेच्या संस्थापिका कल्पना विलास कोठारी. आणि इंडियन आयडॉल स्पर्धा आपल्या सुरेख गायकीच्या जोरावर जिंकणारा सागर विश्वास म्हात्रे यांचे यावेळी विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.
       या पुरस्कार सोहळ्यामध्ये वेगळ्या वाटेवरचे यशस्वी उद्योजक म्हणून डी एम शिप रिपेअर चे सूरदास गोवारी यांना आदर्श लोकसेवक पुरस्कार देण्यात आला. सामाजिक क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य करणारे रवीशेठ पाटील यांचा सन्मान करण्यात आला. परदेशातील ऐश्वर्य झुगारून देशबांधवांची रुग्णसेवा करण्यासाठी झटणारे, कोकण विभागातील पहिले एसआरसीएस ऑर्थोपेडिक सर्जन अभीतेज मस्के यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे डॉक्टर रुपेश वडगावकर आणि आयुष टास्क फोर्स च्या माध्यमातून कोरोना काळात अविरत रुग्णसेवा देणारे डॉ.अमित भक्तिकुमार दवे यांना आदर्श लोकसेवक पुरस्कार देण्यात आला. पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील यांना आदर्श लोकसेवा पुरस्कार बहाल करण्यात आला.
       आदर्श ग्राम विकास अधिकारी म्हणून नंदकिशोर कृष्णा भगत आणि मोहन देविदास पाटील यांना सन्मानित करण्यात आले.आदर्श सरपंच म्हणून शिवकर चे सरपंच अनिल ढवळे यांना सन्मानीत करण्यात आले.माजी सरपंच विश्वास भगत यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. लोकप्रतिनिधी कॅटेगरीमध्ये नगरसेवक विजय चीपळेकर, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक सतीश पाटील आणि नगरसेवक विकास घरत यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष सतीश दत्ता पाटील यांना ते करत असलेल्या अप्रतिम समाजसेवेसाठी आदर्श लोकसेवा पुरस्कार बहाल करण्यात आला. युवा नेते समीर मढवी,समीर माखेचा, माथाडी कामगार व जनरल कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत असणारे बाळासाहेब बोरकर आणि प्रभुदास भोईर, वास्तुतज्ञ महेश सुर्वे यांना आदर्श लोकसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
      कार्यक्रमाचे अंती समूह संपादक विवेक मोरेश्वर पाटील यांनी आभार प्रदर्शन केले तसेच लवकरच, समाजाचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या आरोग्य रक्षकांचा येत्या डॉक्टर दिनानिमित्त सन्मान करणार असल्याचे जाहीर केले.
     

चौकट

सिटी बेल वृत्त समूहाने या सोहळ्यासाठी खास स्वतःचे सन्मानचिन्ह बनवून घेतले होते. किल्ले रायगडावर होळीचा माळ येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या पुतळ्याची प्रतिकृती सन्मान चिन्ह म्हणून प्रदान करण्यात आली.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image