100 कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून केली वीस लाखांची फसवणूक
पनवेल दि.18 (वार्ताहर): शंभर कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खारघर, सेक्टर 12 येथील देवेंद्र डुकरे यांची नव्हीटार रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी आहे. ही कंपनी सौरऊर्जा प्रकल्प राबवून सौर वीज उत्पादन करण्याचे काम करते. त्यांना हैदर अब्बास याने सौर ऊर्जा प्रकल्पकरता दुबई येथून शंभर कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगितले. त्यावेळी खर्च म्हणून पाच टक्के रक्कम पाच कोटी रुपये कमिशन म्हणून मागितली. यावेळी हैदर अबास हे डुकरे यांना मार्च 2019 मध्ये दुबई येथे घेऊन गेले. यावेळी फायनान्सर मसूद अल आवार हे लंडन या ठिकाणी गेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे हैदरने फीरास अल ईसरावी या इसमाशी दुबई येथे भेट करून दिली. व तो फायनान्सर मसुदचा सहकारी असल्याचे सांगितले. ते भारतात परत आल्यानंतर त्यांनी नोटराईज करार केला. यावेळी हैदरला वीस लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र दुबई येथून कोणताही आर्थिक पुरवठा झाला नाही. याबाबत विचारणा केली असता लवकरच पैसे देतो असे सांगून हैदरने रक्कम ॲक्सिस बँकेत ट्रान्सफर झाल्याबाबतची कागदपत्रे दाखवली. यावेळी डुकरे यांनी सदरची कागदपत्त्रांची आयसीआयसीआय बँकेत जाऊन पडतळणी केली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरोपी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.