झुकलेल्या विद्युत पोलांची वीज वितरण कंपनीने केली तातडीने दुरूस्ती..
पनवेल, दि.19 (वार्ताहर): शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सावरकर चौक परिसरात असलेले वीज वितरण कंपनीचे विद्युत पोल हे गंजलेले व एका बाजूला झुकले गेल्याने ते कधीही तेथून ये-जा करणाार्या लोकांच्या अंगावर पडून मोठी दुर्घटना होवू शकते. या संदर्भात स्थानिकांनी संबंधित खात्याकडे तक्रार केल्यावर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग येऊन त्यांनी तातडीने सदर दोन्ही पोलांची दुरूस्ती व नव्याने पोल उभारण्याचे काम आजपासून सुरू केले आहे.
शहरातील सावरकर चौक परिसरात असलेली श्री योग सोसायटी याच्या समोरील विद्युत पोल तसेच मारुती मंदिराच्या बाजूला असलेला विद्युत पोल हा गेल्या काही दिवसापासून एका बाजूला झुकला असून तो कधीही खाली पडण्याची शक्यता आहे. तसेच सदर विद्युत पुल हा गंजलेला व अनेक ठिकाणी सडत चालला आहे. त्यामुळे हे दोन्ही विद्युत पोल खाली पडल्यास मोठी दुर्घटना होवू शकते. तसेच त्यामुळे कित्येक काळासाठी विद्युत पुरवठा सुद्धा खंडीत होवून शॉर्टसर्किट सारख्या घटना सुद्धा घडू शकतात व हे कोणाच्या जीवावर तरी बेतू शकते. अत्यंत जुन्या काळातील हे विद्युत पोल उभारले असून त्याची अवस्था सध्यातरी दयनिय व जीर्ण झालेली आहेत. त्यामुळे हे दोन्ही विद्युत पोल तातडीने बदलण्याची गरज होती. या नागरी समस्येकडे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पांडूरंग बोके यांनी दखल घेऊन लाईनमन परेश केणी व असिस्टंट लाईनमन अरूण पाटील व त्यांच्या पथकाने आज त्याठिकाणी येऊन प्रत्यक्ष दोन्ही पोल बदलून त्याठिकाणी नवीन पोल उभारणीच्या कामाला व इतर वायरिंगच्या कामाला सुरवात केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
फोटो ः नवीन विद्युत पोलाच्या कामाला सुरवात