दऱ्या खोऱ्यात ज्ञानगंगा पोचवणे कौतुकास्पद ; डॉ. अशोक राव मोडक..

दऱ्या खोऱ्यात ज्ञानगंगा पोचवणे कौतुकास्पद ; डॉ. अशोक राव मोडक..

कळंबोली / (दीपक घोसाळकर) :२१ व्या शतकातील विद्यार्थी हा प्रगल्भ व बुद्धिचातुर्य झालेला आहे .त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांना शिकवायला जाताना पूर्ण तयारी करूनच जाणे आता क्रमप्राप्त होईल .शिक्षण देणे ही आता काळाची गरज झाली असून तेही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दऱ्याखोऱ्यातील बहुजनांच्या मुलांना मोफत शिक्षणाचे दालन खुले करून त्यांचा शैक्षणिक विकास साधणे हे निश्चितच गौरवास्पद बाब आहे. त्यात डोंगराळ भागातील दऱ्याखोऱ्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवण्याचे काम चंद्रकांत घोसाळकर करीत असल्याने ती निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार कोकण पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार व अभाविप चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अशोकराव मोडक यांनी पाच्छापूर येथे विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
        श्री सोंमजाई शिक्षण प्रसारक मंडळ पाच्छापूर ही शिक्षण संस्था  अनेक वर्षा पासून सुधागड तालुक्यातील पाच्छापूर सारख्या डोंगराळ वस्तीतील दऱ्याखोऱ्या मध्ये आदिवासी, दलित ,पददलित ,शेतकरी, कामकरी व  बहुजनांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम करीत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अव्याहतपणे ज्ञानगंगा पोहोचवण्याचे काम शिक्षण संस्थेने केले आहे शिक्षण संस्थेची स्वतःची सुसज्ज अशी इमारत नव्हती मात्र
संस्थेची भव्य व सुसज्ज  इमारत सेवा सहयोग फाऊंडेशनच्या विद्यार्थी विकास योजनेंतर्गत उभी राहिली आहे. यावेळी मोडक म्हणाले की मेंदू, मन आणि मनगट या तिन्हीचा विकास शाळेमध्ये होतो. अत्याधुनिक शिक्षण मुलांना मिळाले पाहिजे याचे भान ठेवून संस्थेने शाळेत त्याप्रमाणे योग्य व्यवस्था केली आहे. या इमारतीला न्याय मिळेल असे दर्जेदार शिक्षण सुद्धा येथे मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी दैववादी नाही तर प्रयत्नवादी बनावे. प्रत्येकाने तळागाळातील नागरिकाला मदतीचा हात द्यावा. असे मोडक म्हणाले व सेवा सहयोग फाऊंडेशनच्या कामाचा गौरव केला. तहसीलदार दिलीप रायण्णावार म्हणाले की शिक्षणाने माणूस शहाणा होतो. अशा दुर्गम भागातील शाळांच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थी घडत आहेत व शहाणे होत आहेत. सेवा सहयोग संस्थेचे शरद गांगल यांनी संस्थेच्या कार्याची व उपक्रमाची माहिती दिली. भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर मुख्याध्यापक दीपक माळी यांनी आपल्या प्रस्ताविकातून शाळेची जडणघडण कशी झाली ते सांगून शाळेचे विविध उपक्रम सांगितले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर यांनी भविष्यात शाळेचे व संस्थेचे असणारे उद्दिष्ट सांगितले. आणि सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या जंगम यांनी केले.
    कार्यक्रमास अशोकराव मोडक, शरद गांगल, किशोर मोघे, अरुण करमरकर, चंद्रकांत घोसाळकर, रविकांत घोसाळकर, पांडुरंग डिघे , राजू हंबर्डे, राजीव करंदीकर, गिरीश तुळपुळे, राजेश मपारा, नितीन शेवाळे, अशोक मेहता,  म.  स.  जाधव, मुख्याध्यापक दीपक माळी, सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Comments