तबेल्याच्या लायसन्सचे नुतनिकरण करुन देण्यासाठी २ हजारांची लाच स्विकारणारा दुग्ध संकलन पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात ..
तबेल्याच्या लायसन्सचे नुतनिकरण करुन देण्यासाठी २ हजारांची लाच स्विकारणारा दुग्ध संकलन पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात .. 

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः जनावरांच्या तबेल्याच्या लायसन्सचे नुतनीकरण करुन देण्यासाठी 2 हजार रुपये लाचेची मागणी करुन सदरची रक्कम स्विकारणाऱ्या कोकण भवनमधील जिल्हा दुग्ध व्यावसाय विकास अधिकारी कार्यालयातील दुग्ध संकलन पर्यवेक्षक कमलेश सुधीर धुत्रे (40) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे धुत्रे याने 2 हजार रुपयातील एक हजार रुपयांची रक्कम आपल्या मित्राच्या खात्यात ऑनलाईन स्विकारल्याचे उघडकिस आले आहे.
या घटनेतील पारदार सोनु यादव हा कळवा येथे रहाण्यास असून त्याच्या वडीलांचा गायीचा तबेला आहे. सदर जनावरे पाळण्यासाठी त्यांना दर महिना 50 रुपये शासकीय शुल्क भरावे लागते. मात्र, यादव यांनी गत 10 वर्षाचे शुल्क न भरल्याने सदरचे शुल्क भरण्यासाठी कोकण भवन येथील जिल्हा दुग्ध व्यावसाय विकास अधिकारी कार्यालयातुन यादव यांना नोटीस पाठविण्यात आली होती. त्यामुळे सोनु यादव याने शासकीय दंडाची 6 हजार रुपयांची रक्कम नुकतीच भरली होती. त्यानंतर सोनु यादवचे वडिल कोकण भवन कार्यालयात तबेल्याचे लायनन्स घेण्यासाठी गेले असता, जिल्हा दुग्ध व्यावसाय विकास अधिकारी कार्यालयातील दुग्ध संकलन पर्यवेक्षक कमलेश सुधीर धुत्रे यांनी त्यांचे लायसन्स नुतनिकरण करुन देण्यासाठी त्यांच्याकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केली.  त्यामुळे सोनु यादव हा लायसन्स घेण्यासाठी कोकण भवन कार्यालयात गेला असता, धुत्रे यांनी लाचेची रक्कम न दिल्यास त्याच्या तबेल्याच्या लायसन्सचे नुतनिकरण करणार नसल्याचे सोनु यादव याला सांगितले होते. त्यामुळे सोनु यादव याने ठाणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात याबाबत तक्रार केली होती. सदर पारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याबाबत खातरजमा केली असता, त्यात तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोकण भवन कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी सोनु यादव याने त्याच्याकडे हजार रुपयेच असल्याचे सांगितल्यानंतर धुत्रे यांनी त्याच्या मित्राचे अकाऊंट नंबर मागवून त्यावर सोनु यादव याला हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. सोनु यादव याने ऑनलाईन एक हजार रुपये मित्राच्या खात्यात पाठविल्याची खात्री केल्यानंतर धोत्रे यांनी यादव याच्याकडून रोख एक हजार रुपये स्विकारले. त्यानंतर त्याच्या लायसन्सचे नुतनीकरण करुन दिले. त्यानंतर लाच लुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुग्ध संकलन पर्यवेक्षक कमलेश सुधीर धुत्रे यांना रेंगेहाथ अटक केली.
Comments