इंटरनेट कंपनीचा डाटा चोरुन ग्राहक दुसर्या कंपनीकडे वाळविणार्या दोन इंजिनियरचा पोलिसांकडून शोध सुरू...
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः डि-व्हॉईस एस.एस.व्ही. ब्रॉडबँड या इंटरनेट सेवा पुरविणार्या कंपनीत काम करणार्या दोघा इंजिनियरने कंपनीतील ग्राहकांचा डाटा चोरुन सदरचा डाटा ट्रुनेट या कंपनीला दिल्याचे तसेच डिव्हाई कंपनी बंद होणार असल्याची खोटी माहिती ग्राहकांना देऊन शेकडो ग्राहकांना ट्रुनेट कंपनीकडे परस्पर वळविल्याचे उघडकिस आले आहे. संदिप बागल व विनय आंब्रे असे या दोन इंजिनियरची नावे असुन एनआरआय पोलिसांनी या दोघां विरोधात आयटी ऍक्टसह विवध कलमाखांली गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
डि-व्हॉईस एस.एस.व्ही. ब्रॉडबँड या इंटरनेट सेवा पुरविणाऱया कंपनीचे सीवूड्स मधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये मुख्य कार्यालय आहे. गत महिन्यामध्ये या कंपनीची इंटरनेट सेवा बंद होणार असल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी डिव्हॉईसच्या कस्टमर केअर कडे केल्या होत्या. त्याचप्रमाणे डिव्हाइसच्या अनेक ग्राहकांचे युजर आयडी व पासवर्ड चोरी झाल्याचे तसेच काही ग्राहकांची इंटरनेट सेवा बदलण्यात येऊन त्यांचे रिचार्ज रोख रक्कमेद्वारे करण्यात आल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे ट्रुनेट कंपनीच्या कस्टमर केअर कडून डिव्हाइसच्या ग्राहकांना संपर्क साधण्यात येऊन त्यांना डिव्हाईस ऐवजी, ट्रुनेट या कंपनीकडून इंटरनेट सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे डिव्हाईस कंपनीने याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कंपनीतील सर्व कर्मचाऱयांकडे चौकशी करतानाच वाशी येथील सर्व्हर रुममधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. या तपासणीत डिव्हाईस कंपनीतून ऑक्टोबर महिन्यात राजिनामा देऊन गेलेले इंजिनियर संदिप बागल व विनय आंब्रे हे दोघे तेथील सिस्टिममध्ये अदलाबदल करताना आढळुन आले. यावेळी त्यांच्या सोबत डिव्हाईस कंपनीत काम करणारे इतर पाच कर्मचारी देखील असल्याचे आढळुन आले. त्यामुळे डिव्हाईस कंपनीतील ग्राहकांचा डाटा चोरणाऱयांचा कंपनीने सायबर तज्ञाच्या माध्यमातून शोध घेतला असता, सदरचा डाटा हा संदिप बागल व विनय आंब्रे या दोघांनीच चोरल्याचे तपासणीत आढळुन आले. त्यामुळे डिव्हाईस कंपनीच्या संचालकांनी एनआरआय पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात लेखी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवरुन पोलिसांनी संदिप बागल आणि विनय आंब्रे या दोघां विरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.