रायगड पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन...
रायगड पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन...

पनवेल : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. रायगड पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता याबरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील ५ वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. त्यानुसार नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व  तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१-२२ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक / शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ http://ah.mahabms.com , अड्रोइड मोबईल आप्लीकेशन नाव AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध ), अर्ज करण्याचा कालावधी ०४/१२/२०२१ ते १८/१२/२०२१, टोल फ्री क्रमांक १९६२ किवा १८००-२३३-०४१८

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत:चे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.

          यावेळी  जास्तीत जास्त इच्छुक बेरोजगार तरुण-तरुणींनी या सुलभ पद्धतीचा उपयोग करून ठरवून दिलेल्या वेळेत पशुसंवर्धन विषयक विविध नाविन्यपूर्ण योजनांमध्ये अर्ज करून सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉक्टर सु. चि. मस्के यांनी केले. यावेळी डॉ आर. बी. काळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, कार्यालय रायगड अलीबाग, डॉक्टर अनिल धांडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व डॉक्टर लाळगे सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अलिबाग हे उपस्थित होते.
Comments
Popular posts
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image