महिला न्यायाधीशांच्या नावाने ज्वेलर्स दुकानदाराला भामट्याने घाताला 5 लाख 96 हजारांना गंडा
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः बेलापुर न्यायालयातील एका महिला न्यायाधीशांचा चालक असल्याचे सांगून एका भामट्याने न्यायाधीशांच्या नावाने बेलापुर गावातील एका ज्वेलर्स मालकाकडून तब्बल 5 लाख 96 हजार रुपये किंमतीच्या 11 सोन्याच्या अंगठ्या व 3 सोन्याच्या चैन लुबाडुन नेल्याचे उघडकिस आले आहे. विशेष म्हणजे या भामट्याने ज्वेलर्सच्या कर्मचार्याला पैसे देण्याच्या बहाण्याने बेलापुर न्यायालयात नेऊन त्याच्या जवळचे दागिने घेऊन पलायन केल्याचे उघडकिस आले आहे. एनआरआय पोलिसांनी या भामटयाविरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील आरोपी भामटा संदिप वानखेडे बेलापुर गावातील भेरुसिंह हिरासिंह खरवाड यांच्या मातोश्री ज्वेलर्स या दुकानात गेला होता. यावेळी त्याने बेलापुर कोर्टातील महिला न्यायाधिशांचा चालक असल्याचे सांगून सदर महिला न्यायाधीश रिटायर्ड होत असल्याने त्यांना त्यांच्या खास लोकांना सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चैन भेट म्हणून द्यायचे आहेत असे सांगितले. त्यासाठी 5 ग्रॅम वजनावरील 11 सोन्याच्या अंगठ्या व 1 तोळे वजनाच्या 3 चैन न्यायाधीशांना हवे असल्याचे ज्वेलर्स मालाकाला सांगितले. तसेच महिला न्यायाधिशांना दागिने दाखविण्यासाठी कॅटलॉग त्याच्या सोबत घेऊन न्यायालयात येण्यास सांगितले. त्यामुळे ज्वेलर्स मालक खरवाड यांनी आपल्या दुकानातील कर्मचाऱयाला वानखेडे सोबत कॅटलॉग घेऊन पाठवून दिले. त्यानंतर भामट्या वानखेडे याने ज्वेलर्सच्या कर्मचाऱयाला बेलापूर येथील न्यायालयात नेऊन दुसऱया मजल्यावरील कोर्ट रुमच्या बाहेर त्याला बसविले. त्यानंतर तो न्यायाधीशांना दागिन्यांचे डिझाईन दाखवण्याच्या बहाण्याने कोर्ट रुममध्ये गेला. काही वेळानंतर बाहेर आलेल्या भामट्या वानखेडे याने न्यायाधीशांना एकाच डिझाईनच्या 11 सोन्याच्या अंगठ्या हव्या असल्याचे सांगितले. मात्र ज्वेलर्सच्या कर्मचार्याने त्यांच्याकडे एकाच डिझाईनच्या अंगठ्या नसल्याचे सांगितल्यानंतर वानखेडे याने वेगवेगळ्या डिझाईनच्या अंगठ्या असल्या तरी चालतील असे सांगितल्यानंतर ज्वेलर्सच्या कर्मचार्याने भामट्या वानखेडे याला आपल्या दुकानात नेले. त्यानंतर भामट्या वानखेडे याने 5 लाख 96 हजार रुपये किंमतीच्या 11 सोन्याच्या अंगठ्या व 3 सोन्याच्या चैन पसंत करुन सदर दागिन्यांचे पैसे न्यायाधीश मॅडम न्यायालयात देतील असे सांगून ज्वेलर्सच्या कर्मचाऱयाला सर्व दागिने घेऊन न्यायालयात येण्यास सांगितले. त्यानुसार कर्मचारी दागिने घेऊन भामट्या वानखेडे सोबत न्यायालयात गेल्यानंतर वानखेडे याने त्याच्याकडे असलेले दागिने घेऊन कर्मचाऱयाला पुन्हा त्याच कोर्टरुम बाहेर बसवून कोर्टरूम मध्ये गेला. त्यानंतर काही वेळनंतर बाहेर येऊन न्यायाधीश मॅडम सहा लाख रुपये देणार असल्याचे व त्यांना आणखी सोन्याचे कॉईन हवे आहेत, असे सांगून त्याठिकाणावरुन दागिने घेऊन पलायन केले. दुपारी 3. 30 वाजता कोर्टरुममधून न्यायाधिश बाहेर आल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱयाने बाहेर बसलेल्या ज्वेलर्सच्या कर्मचाऱयाकडे विचारपुस केल्यानंतर त्याने दागिन्यांचे पैसे घेण्यासाठी थांबल्याचे सांगितले. यावेळी न्यायाधीशांनी कुणाकडूनही त्यांनी सोने मागविले नसल्याचे व संदीप वानखेडे नावाचा कर्मचारी न्यायालयात कामाला नसल्याचे सांगितले. त्यानंतर ज्वेलर्स कर्मचार्यांला फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने फोनवरून याबाबतची माहिती आपल्या मालकाला दिल्यानंतर ज्वेलर्स मालकाने व त्याच्या कर्मचाऱयाने एनआरआय पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.