खेलो इंडिया यूथ गेम्स जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात...
खेळामध्ये प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यास यश नक्की मिळते - प्रांताधिकारी ललिता बाबर
पनवेल, दि. २९ (वार्ताहर) ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल येथे करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील 18 वर्षाखालील मुलांच्या एकूण 16 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू तथा प्रांताधिकारी उरण ललिता बाबर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी ललिता बाबर यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडूंनी आपल्या खेळांमध्ये प्रामाणिक कष्ट घ्यावे तसेच खेळांमधील जय-पराजय हे खिलाडू वृत्तीने स्वीकारावेत. पराजित झालेल्या खेळाडूंनी निराश न होता पुन्हा नव्या जोमाने पुढील स्पर्धेची तरी करून अधिकाधिक यश संपादन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, त्यांनी उपस्थित खेळाडूंना सांगितले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच या निवड समिती सदस्य सूर्यकांत ठाकूर, संजय कडू, कर्नाळा स्पोर्टस कॅडमीचे अध्यक्ष मुकुंद म्हात्रे, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जनार्दन पाटील, प्रो-कबड्डी स्पर्धेचे पंच सुहास पाटील, कबड्डी असोसिएशनचे पंच, तांत्रिक अधिकारी, क्रीडा शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथील अधिकारी कर्मचारी तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच व इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.