शाळेत हेल्थ केअर क्लिनिक सुरु करण्याची महत्वपूर्ण अट
पनवेल, दि.१ (वार्ताहर) : - पनवेल तालुक्यातील शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा दि.४ ऑक्टॉबर पासुन सुरु होणार आहेत. यामध्ये शाळेत हेल्थ केअर क्लिनिक सुरु करण्याची महत्वाची अट शासनाने घातली आहे.ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 व शहरी भागातील 8 वी ते 12 वीच्या सर्व शाळा या निर्णयामुळे सुरु होणार आहेत.
पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद ,पनवेल महानगरपालिकेच्या मालकीसह खाजगी शाळा व महाविद्यालये मोठ्या प्रमाणात आहेत.हि संख्या शेकडोंच्या घरात असल्याने पुन्हा एकदा ओस पडलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची रेलचेल पहावयास मिळणार आहे.
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात दि. 29 रोजी परिपत्रक काढून विविध अटी शर्तीच्या आधार तालुक्यातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.शाळा सुरु करताना विविध अटी व शर्तीचे पालन करण्याच्या सूचना या परिपत्रकात करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये शाळेत हेल्थ केअर क्लिनिक सुरू करण्याच्या महत्वपूर्ण अटींचा समावेश आहे.
काय आहेत अटी शर्ती ?
प्रत्येक शाळेत हेल्थ केअर क्लिनिक
या क्लिनिक मध्ये नियमित टेम्परेचर तपासणी,शक्य असल्यास ईच्छूक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी,सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात,हेल्थ केअर क्लिनिक मध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर परिचारिकांची मदत घ्यावी ,या कामांसाठी सीएसआर किंवा स्थानिक निधीतुन खर्च करण्यात यावा.
शाळेत येताना घ्यावयाची काळजी -
मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करणे ,स्कुल बस अथवा खाजगी वाहनाद्वारे येणारे विद्यार्थी एका सीटवर एकच विद्यार्थी बसेल याची दक्षता घ्यावी,विद्यार्थी बस मध्ये चढताना उतरताना विद्यार्थ्यांना सॅनिटायझर वापरण्यास प्रोत्साहित करावे.
विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन -
पहिल्या 1 ते 2 आठवड्यामध्ये थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यास शाळेची गोडी लावावी,विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी अवगत करून त्यानुसार विद्यार्थ्यांशी परस्पर संवाद साधावा,कोविड होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे ,विद्यार्थी पालकांशी ऑनलाईन ,ऑफलाईन संपर्कात राहणे.
शिक्षक पालक बैठकीत चर्चा -
कोविड आजाराबाबत माहिती देऊन संबंधित आजार टाळण्यासाठीची माहिती देणे,पालकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देणे,पालकांनी पुरेसे मास्क तयार करून त्यांना नियमित धुणे ,विद्यार्थ्यांची मोबाईलची सवय सुटण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करणे ,मुलांवर दप्तराचा ओझ वाढणार नाही याबाबत खबरदारी घेणे.
घरात प्रवेश करताना काळजी -
घरात आल्यावर थेट स्नानगृहात जाणे ,स्नान करून युनिफॉर्म बदलणे ,मास्क ,कपडे व्यवस्थित धुणे ,
सीएसआर निधीचा उपयोग करणेबाबत -
शाळा फॅन ,सॅनिटायझर ,वैद्यकीय उपकरणे यामध्ये ऑक्सिमीटर ,इन्फ्रारेड थर्मामीटर ,औषध, मास्क आदी गोष्टी सीएसआर निधीतुन उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याचे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
प्रतिक्रिया -
शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.मात्र काही अटी शर्तीचा यामध्ये समावेश आहे.पालक व शाळा प्रशासनाने या अटी शर्तीचे पालन करावे असे आवाहन पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.