निर्भया पथकातील महिला पोलिसावर हल्ला करुन त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचणारा आरोपी जेरबंद ....


पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः रेल्वे पोलिसांच्या निर्भया पथकातील महिला पोलिसावर धावत्या लोकलमध्ये हल्ला करुन त्यांचे मंगळसुत्र खेचुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका लुटारुला निर्भया पथकातील महिला पोलिसांनी पकडल्याची घटना मंगळवारी भरदुपारी जुईनगर ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान घडली. कृष्णा वासु राठोड (19) असे या लुटारुचे नाव असून वाशी रेल्वे पोलिसांनी त्याला जबरी चोरीच्या गुह्याखाली अटक केली आहे.  
या घटनेतील महिला पोलीस अंजली कोरडे या रेल्वे पोलिसांच्या निर्भया पथकात कार्यरत असून त्या नेरुळ येथे रहाण्यास आहेत. कोरडे या नेहमी प्रमाणे साध्या वेशात जुईनगर रेल्वे स्थानकातून पश्‍चिम परिमंडळातील निर्भया पथकात कामावर जात होत्या. यावेळी त्या सीएसटी लोकलच्या महिलांसाठी असलेल्या प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करत होत्या. सदर डब्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती बसला असल्याने महिला पोलीस अंजली कोरडे यांनी त्याला सदर डबा हा महिलांसाठी राखीव असल्याचे सांगून त्याला पुढील स्टेशनवर खाली उतरुन पुरुषांच्या डब्यात जाण्यासाठी सांगितले. त्यामुळे सदर व्यक्तीने महिला पोलीस कोरडे यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांचा गळा पकडून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र खेचले. त्यानंतर सदर लुटारु पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना महिला पोलीस अंजली कोरडे यांनी त्याला प्रतिकार करुन पकडून ठेवत आरडा ओरड सुरु केली. यादरम्यान, वाशी रेल्वे स्टेशन आल्यानंतर अंजली कोरडे यांच्यासह निर्भया पथकात कार्यरत असलेल्या  महिला पोलीस हवालदार इंगवले व कळंबे या डयुटीवर जाण्यासाठी त्याच डब्यात चढल्या. त्यानंतर अंजली कोरडे यांनी त्यांच्या मदतीने आरोपी कृष्णा वासु राठोड (19) याला पकडले. मात्र तोपर्यंत वाशी रेल्वे स्थानकातुन लोकल सुटल्याने महिला पोलिसांनी आरोपीला मानखुर्द रेल्वे स्थानकात उतरवून वाशी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर वाशी पोलिसांनी आरोपीला जबरी चोरीच्या गुह्याखाली अटक केली आहे. तसेच त्याने अंजली राठोड यांची लुटलेली 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याची चैन हस्तगत केली.
Comments