गणेशोत्सवानिमित्त हुवेई कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी...
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले असून त्यांना खाण्यापिण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. समाजातील गरीब व तळागाळातील घटकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. ही अडचण लक्षात घेता हुवेई कंपनीने पनवेल परिसरातील एक हजार गरजवंत कुटुंबाना मदतीचा हात म्हणून आज (शनिवार दि.18 सप्टेंबर) करंजाडे येथील सभागृहात जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने अन्नधान्यासह कोरोना खबरदारीच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, साबण तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटपही करण्यात आले. यावेळी हुवेई कंपनीचे एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर हर्ष खुराना, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, अक्षयपात्रचे जनरल मॅनेजर सुरेश निमोणकर, गौरांग खुराना, के के कांचन, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, अंकुश तरटे, अमर वाघमारे, कांचन घरत यांच्यासह आदी उपस्थित होते.
यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी बोलताना सांगितले की, हुवेई कंपनी ही मोठ्या प्रमाणात वर्षभर सामाजिक बांधिलकी जपून विविध उपक्रम राबवित असते. समाजातील तळागाळातील लोकांना मदतीचा हात म्हणून त्यांनी आज राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमात पोलिसांचीही मदत त्यांनी घेतली याचा आनंद आहे. सर्व पोलीस अधिकार्‍यांनी आदिवासी वाड्या, डोंगराळ भागातील वस्ती, नाल्याशेजारी राहणारे, झोपडपट्ट्या आदी ठिकाणी जाऊन प्रत्येकाची माहिती घेऊन यादी बनवली. त्या अनुषंगाने आज सर्व गरीब गरजूंना वाटप करण्यात आले असून यापुढेही मदतीचा ओघ सुरूच राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करावा असे आवाहन शासनाने केले होते, त्याला अनुसरून खर्‍या अर्थाने गणेशोत्सव समाजोपयोगी उपक्रमाने आज साजरा होत असल्याचा आनंद आहे. अक्षयपात्रचे जनरल मॅनेजर सुरेश निमोणकर व त्यांच्या टीमने हे सर्व किटचे पॅकेट बनवून दिले आहेत त्यांचे आभार.
हुवेई कंपनीचे एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर हर्ष खुराना हे म्हणाले की, या उपक्रमात पोलिसांची मोठी मदत मिळाली. पोलिसांमुळे ही मदत योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे अक्षयपात्रचे जनरल मॅनेजर सुरेश निमोणकर यांची मदत सुद्धा मोलाची आहे. या सर्वांमुळेच हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवू शकलो.

Comments